NCP | शरद पवार गटाला मोठा धक्का, अजित पवार गटाची केंद्रीय पातळीवर ताकद वाढली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोट गटात चांगलाच संघर्ष बघायला मिळतोय. या दोन्ही गटांचा संघर्ष आता केंद्रीय निवडणूक आयोगातदेखील बघायला मिळणार आहे. निवडणूक आयोगात 6 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. पण त्याआधी एक मोठी बातमी समोर आलीय.
मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कायदेशीर लढाई सुरु झालीय. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट या दोन्ही गटांना येत्या 6 ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी आता प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. दोन्ही गट एकीकडे पक्षात फूट पडलेली नाही, असा दावा करत आहेत. तर दुसरीकडे दोन्ही गटांकडून पक्षावर दावा केला जातोय. दोन्ही गट एकमेकांचे दावे फेटाळत आहेत. त्यातून दोन्ही गटातील संघर्ष वाढताना दिसतोय. असं असताना आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.
अजित पवार यांच्या गटाकडून आपल्याकडे सर्वाधिक 40 आमदारांचा पाठींबा आहे, असा दावा केला जातोय. असं असताना आता या गटाने केंद्रीय पातळीवर आपल्या गटाकडे जास्त ताकद आहे, हे दाखण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी या गटाच्या ज्येष्ठ नेत्यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे खासदार प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ, तसेच नागालँडच्या राष्ट्रवादीच्या आमदारांसह महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी सविस्तर भूमिका मांडली.
प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले?
प्रफुल्ल पटेल यांच्याआधी सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “नागालँडचे आमचे प्रदेशाध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी आम्हाला पाठिंबा दिलाय. त्यांनी अजित पवारांनी घेतलेल्या निर्यायाला पाठिंबा दिलाय”, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं. तटकरे यांच्या प्रतिक्रियेनंतर प्रफुल्ल पटेल यांनी भूमिका मांडली.
“आम्ही नागालँडच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांचं स्वागत करतो. या सर्व सहकाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलाय. त्यांनी तसे एफीडेव्हीट देखील आम्हाला दिले आहेत. आमच्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता काढण्यात आली. मात्र आमचा पक्ष नागालँडमध्ये आणि महाराष्ट्रात आहे. नागालँडच्या 7 पैकी 7 आमदारांनी आम्हाला समर्थन दिलं आहे”, अशी महत्त्वाची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. “आम्ही ज्या दिवशी एनडीएत सहभागी झालो त्याच दिवशी आम्ही नागालँड युनिटला पत्र दिले की, आपण एनडीएत सहभागी झालोय”, असंही पटेल यांनी सांगितलं.
‘पक्षातील नियुक्ती घटनेला धरुन नाही’
“पक्षाच्या संघटनात्मक ढाचा जो आहे त्यानुसार वेळोवेळी ज्या निवडणूका व्हायला पाहिजे त्या झाल्या नाहीत. एक अधिवेशन होवून नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. या नियुक्त्या पक्षाच्या घटनेनुसार नाहीत. 10 व्या शेड्युलनुसार पक्ष सर्वोच्च आहे. तर मग पक्षाची घटना देखील पाळली पाहिजे. मात्र ते झालं नाही. आमच्या निवडणूकाच झाल्या नाहीत तर गर्दी जमवून आम्ही ही लोकं पदावर निवडली आहे, असं सांगणं असंविधानिक आहे. आमच्या पक्षात ज्या लोकांना निवडले होते ते घटनेला धरुन नाही”, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला.
‘आम्ही सर्व निश्चिंत आहोत’
“महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे प्रकरण सुरु आहे. मात्र आमचे प्रकरण आणि त्यांचे प्रकरण एकसारखे अजिबात नाही. त्यांची केस वेगळी आहे. आमची केस वेगळी आहे. आम्ही सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करुन निर्णय घेतला आहे. काही लोक एकनाथ शिंदे केसवरुन कन्फ्यूज आहेत. त्यांचा काय निर्णय होईल हे मला माहित नाही, मला त्यावर बोलायचे नाही. मात्र आम्हाला चिंता करायची गरज नाही. आम्ही सर्व लोक निश्चिंत आहोत”, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.