‘ओबीसी नेत्यांनी माझ्या नांदी लागू नये’, प्रकाश आंबेडकर यांचा इशारा
"आरक्षणावरुन वाद सुरु झालाय. ओबीसी जे काही सध्या नेते आहेत त्यांनी कृपा करुन माझ्या नांदी लागू नये. इतिहास काढला तर तुम्ही मंडल बरोबर नव्हता तर कमंडल बरोबर होता. मग ते शेंडगे असतील किंवा भुजबळ असतील", असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मुंबई | 25 नोव्हेंबर 2023 : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात संविधान सन्मान महासभेचं आयोजन केलं. या सभेत प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी नेत्यांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. ओबीसी नेत्यांनी माझ्या नांदी लागू नये, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. “आरक्षणावरुन वाद सुरु झालाय. ओबीसी जे काही सध्या नेते आहेत त्यांनी कृपा करुन माझ्या नांदी लागू नये. इतिहास काढला तर तुम्ही मंडल बरोबर नव्हता तर कमंडल बरोबर होता. मग ते शेंडगे असतील किंवा भुजबळ असतील”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. “ओबीसींचं आरक्षण मिळवणारे आम्हीच आहोत, जनता दलाबरोबर आणि त्याच्याअगोदर जनता पार्टीबरोबर. आता सरळ वाचवता येत नाही म्हणून सरळ भिडवण्याची भाषा चालू आहे”, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
“दुर्देवाने इकडे असताना शासनाने विकासाच्या योजना आखल्याच नाहीत. म्हणून आपला विकास करुन घ्यायचा असेल तर आरक्षण हा एकमेव मार्ग असंच झालंय”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. “आरक्षण हा काही विकास नाही. तर आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. राजे-महाराजांच्या कालावधीत ज्यांना आपण क्षुद्र, दलित म्हणतो, जे ओबीसी, दलित आहोत, अशांना दरबारात चोपदार होण्याचासुद्धा अधिकार नव्हता. शिवाजी महाराजांचा कालखंड सोडला तर उरलेल्या इतिहासात नव्हताच. प्रशासनात संबंध नव्हता. उद्याच्या लोकशाहीत, स्वतंत्र देशामध्ये ही लोकं पुन्हा बाहेर राहू नये यासाठी यांचा प्रतिनिधी राहावा म्हणून आरक्षण आलं”, असं आंबेडकर म्हणाले.
‘ओबीसींचे आणि मराठ्यांचे नेतेच पहिल्यांदा विकासाचे विरोधक’
“आज जे आरक्षणवादी आहेत ते आरक्षणविरोधी आहेत. हे शिक्षणमहर्षी आहेत. त्यांनाही कळतंय, भारतातून परदेशात किती विद्यार्थी शिक्षणासाठी जातात? सगळ्यांनी घरी जावून मोबाईलवर चेक करा, 20 लाख विद्यार्थी शिक्षणासाठी देशाबाहेर जातात. एका विद्यार्थ्यावर 40 लाख खर्च होत असतील तर किती पैसा बाहेर जातोय हे लक्षात घ्या. हे स्वत:ला शिक्षणसम्राट म्हणत आहेत, ओबीसींचे आणि मराठ्यांचे नेते म्हणत आहेत तेच पहिल्यांदा विकासाचे विरोधक आहेत. आपल्या संस्था चालल्या पाहिजेत म्हणून त्यांनी नव्या संस्था येऊ दिल्या नाहीत”, असा आरोप आंबेडकरांनी केला.
“दुसऱ्या शिक्षण संस्थांना नव्याने उभं राहू दिलं नाही. म्हणून संकुचित शिक्षण केलंय. या देशाचा विदेशात जाणारा कोट्यवधी रुपयांचा निधी थांबला असता आणि देशाचा विकास झाला असता”, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला.”आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हाच मी म्हणालो होतो की, ओबीसी आणि मराठ्यांचं ताट वेगवेगळं असायला पाहिजे. काही प्रश्नांचा निकाल मंडलवेळेस निघाला होतो. तो १९८० साली निघाला होता. आता ४० वर्षे झाले आहेत. आता परिस्थिती बदलली आहे. शासनाच्या न विकसित धोरणामुळे आज प्रत्येकाला वाटतंय की मला आरक्षण मिळालं तर माझा विकास होईल, अशी परिस्थिती आहे”, असं मत प्रकाश आंबेडकरांनी मांडलं.