शरद पवार यांच्यासोबत बंददाराआड भेट, काय झाली चर्चा?; Prakash Ambedkar अखेर बोलले
तुम्ही आम्हाला लुटत आहात, असा आरोप दादाभाई नौरोजी यांनी त्या काळात ब्रिटिशांवर आरोप केला होता. पण दादाभाईनंनी थिअरोटिकल मांडणी केली नव्हती. बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीतून ब्रिटीश भारताला कसे लुटत आहेत, त्याची मांडणी केली होती.
गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 21 ऑक्टोबर 2023 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज चव्हाण सेंटरमध्ये भेट झाली. खासदार सुप्रिया सुळे यांनी या दोन्ही नेत्यांची भेट घडवून आणली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीत इंडिया आघाडीतील वंचितच्या समावेशावर चर्चा झाल्याची चर्चा असतानाच प्रकाश आंबेडकर यांनीच बैठकीतील तपशील दिला आहे.
शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर प्रसन्न दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड हास्य होतं. त्यामुळे शरद पवार आणि आंबेडकर यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचं दिसत आहे. चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मी वक्ता म्हणून आलो होतो. या कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांनी कॉफी प्यायला बोलावलं. शरद पवारही तिथे होते. आम्ही एकूण 12 जण तिथे होते. त्यामुळे तिथे कॉफी घेण्याशिवाय काहीच झालं नाही, असं सांगतानाच मी साखर टाकून कॉफी गोड केली, असं सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं.
आघाडीवर बोलणार नाही
शरद पवार यांच्यासोबत कॉफी घेतली. आम्ही एकूण 12 जण होतं. एवढ्या लोकांमध्ये राजकीय चर्चा होईल अशी अपेक्षा नाही. मी महाविकास आघाडीवर बोलणार नाही. कारण त्याबाबत काहीच घडलं नाही. पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काही घडेल असं काही वाटत नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
भाजपसोबत येणार नाही
काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना पुढे येऊ देत नाही. त्यांच्यावर अन्याय करत असते, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं. त्याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. मान्य आहे ना. पण माझा भाजपला कायम विरोध आहे हेही बावनकुळेंनी लक्षात घ्यावं. काँग्रेस मला सोबत घेत नाही म्हणून मी भाजपकडे येईल अशी आस लावून बसले असतील तर त्यांनी वाट बघत राहावी, असा टोला त्यांनी लगावला.
फसवाफसवी थांबवा
मनोज जरांगे पाटील यांच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला. शासनाने जरांगे पाटलांशी इमानदारीने बोलावं. चार महिने, दोन महिने देत आहे असं करू नये. कुणी बोलत नाही. पण शासनाला सांगतो, गावात गेलो तर 20-25 वर्षांच्या तरुणांच्या हाताला कामं नाहीत. त्यांची लग्न झालेलं नाहीत. हा लँडेड क्लास आहे. या वर्गाच्या कौटुंबिक समस्याही निर्माण झाल्या आहेत. व्यक्तिगत समस्या आहेत.
जरांगे पाटील यांना पाठिंबा या क्लासचा आहे. मीही ते अनुभवलं आहे. ते सांगतो. मी ठासनीला गेलो होतो. पाच सहा ठिकाणी. मुलीचे आईवडील आतल्या खोलीत घेऊन जायचे. नोकरीला लावणार का असं विचारायचे. शब्द दिला तरच लग्न जुळायचं. नाही तर लग्न जुळत नाही. या सामाजिक परिस्थितीचं भान राज्यकर्त्यांना आलं असेल असं वाटतन नाही. फसवाफसवी थांबवा. नाही तर सरकारवरच उलटेल, असा इशारा त्यांनी दिला.
वादळ निर्माण झालंय, प्रामाणिक राहा
आरक्षण आणि जातगणनेचा संबंध नाही. बिहारच्या जातगणनेतून एकच बाहेर आलं, ते म्हणजे कोणतीही जात प्रबळ नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एवढी वर्ष प्लॅनिंग होऊनही आर्थिक दृष्टीकोणातून बदल झाला नाही. राज्यातील जनगणना झाली तर इकॉनॉमिक असमतोल वाढला असल्याचं दिसून येईल. त्यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे. जरांगे पाटील यांच्या नावाने वादळ उभं राहिलं आहे त्यावर प्रामाणिक राहावं. नाही तर परिणाम होतील, असं ते म्हणाले.
तो शेतकऱ्यांचा निर्णय
जरांगे पाटील यांना शेतकऱ्यांनी स्वत:हून सभेसाठी शेती दिली. दीडशे एकर शेतीतील पिकं नष्ट केली. हा शेतकऱ्यांचा निर्णय होता. त्यांना भरपाई मिळालेली नाही. काही जणांनी राहण्याची जेवण्याची सोय केली. याला अदृश्य म्हणाल तर अदृश्य आहे. पण ते ठरवून नाही. उत्स्फूर्त आहे. फडणवीस यांनी भुजबळांच्या माध्यमातून सभेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. फंडिंग कोण करतं? असा सवाल केला आहे. भुजबळांना विनंती आहे तुमचंही बाहेर काढतील. राग समजून घ्या. नाही तर तुमच्यावर उलथेल, असं ते म्हणाले.