मुंबई : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ‘नाईट लाईफ’च्या संकल्पनेचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar on night life) यांनी समर्थन केले आहे. “मी नाईट लाईफच्या जगातच मोठा झालो आहे. ज्यांना मुंबईची माहिती नाही तेच याला विरोध करत आहेत”, असे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar on night life) म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यांच्या विरोधात प्रकाश आंबेडर यांनी येत्या 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना 24 जानेवारीचा महाराष्ट्र बंद शांततेने करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी माहिती दिली.
दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी देशातील राज्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणे असंवैधानिक असल्याचे म्हटले होते. याच वक्तव्याबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता ‘केंद्राचा कायदा लागू होतो ही गोष्ट खरी आहे पण राज्यांना वेगळं मत मांडण्याचा अधिकार आहे’, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा भारतात लागू झाला आहे. या कायद्याला वंचित बहुजन आघाडीकडून विरोध केला जात आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून याअगोदर आंदोलनही करण्यात आले आहेत. मात्र, आता थेट महाराष्ट्र बंदची हाक प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. येत्या 24 जानेवारीला महाराष्ट्र बंद राहील, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी काल (18 जानेवारी) पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला त्यांनी विरोध दर्शवला होता. याशिवाय दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या दादरला वंचित बहुजन आघाडीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक देण्याचा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याऐवजी तो पैसा वाडीया रुग्णालयाला देण्याच्या माझ्या भूमिकेचं उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. पण त्याचे काय करायचं याचा निर्णय राज्य सरकार आणि कोर्टाने घ्यावा”, असेदेखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.