Raj Surve | आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा अद्यापही फरार, पोलिसांकडून कसून शोध सुरु, अडचणी वाढणार?
आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याचा पोलिसांकडून कसून शोध सुरु आहे. एका म्युझिक कंपनीच्या मालकाला अपहरण, मारहाण प्रकरणात त्याचं नाव आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना मुंबई विमानतळावरुन अटक केलीय. पण राज सुर्वे पोलिसांच्या हाती लागत नाहीय.
मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : एका म्युझिक कंपनीचा मालक राजकुमार सिंह अपहरण प्रकरणात वनराई पोलिसांनी आतापर्यंत केवळ तीन जणांना अटक केली आहे. शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलगा राज सुर्वेसह इतर सर्व आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केलं आहे. तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत 2 डझनहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाचाही पोलिसांनी पंचनामा केला आहे, जिथे राजकुमार सिंह यांना नेले होते. पोलीस त्या केबिनमधील सीसीटीव्हीही तपासत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज सुर्वेसह सर्व वॉन्टेड आरोपी एकत्र फरार आहेत.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरातून भर दिवसा वर्दळीच्या ठिकाण असलेल्या अपार्टमेंटमधून एका म्युझिक कंपनीच्या मालकाचं अपहरण करण्यात आलं. विशेष म्हणजे शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यानं हे अपहरण केल्याचा आरोप आहे. राजकुमार सिंह यांना दुपारच्या सुमारास अनोळखी नंबरवरुन कॉल आला. पण तो कॉल राजकुमार यांनी उचलला नाही.
यानंतर पुढच्या दहाच मिनिटात राज सुर्वे यांनी पाठवलेले गुंड राजकुमार सिंह यांच्या कार्यालयात आले आणि त्यांनी मारहाण आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर राजकुमार सिंह यांचं अपहरण करुन त्यांना आमदार प्रकाश सुर्वेंच्या दहिसर ईस्टमधल्या ऑफिसमध्ये नेण्यात आलं. तिथं प्रकाश सुर्वेंचा मुलगा राज सुर्वे यानं राजकुमार सिंह यांना धमकावलं.
राजकुमार सिंह यांनी सांगितला घटनाक्रम
“अननोन नंबरवरुन कॉल आला. ते तिसऱ्या मजल्यावर आले. कॉल का रिसिव्ह केला नाही. मारायला सुरुवात केली. शिव्या दिल्या. बापाचा फोन का उचलत नाही? प्रकाश सुर्वेला ओळखत नाही का? असा सवाल करत शिवीगाळ आणि मारहाण केली”, असं राजकुमार सिंह यांनी सांगितलं.
“राज सुर्वेनं धमकी दिली. मला 12 ते 17 जणांनी ऑफिसमध्ये घेरलं. स्टाफनं घरी फोन केला. घरुन कंट्रोल रुमला फोन केला. कंट्रोल रुमनं राज सुर्वेला फोन केला. राज सुर्वे कंट्रोल रुमला अभद्र भाषेत बोलला. दुसऱ्या जागी शिफ्ट केलं”, असंही राजकुमार सिंह यांनी सांगितलं.
राज सुर्वे राजकुमार सिंह यांना का धमकावत होता?
राज सुर्वे हा राजकुमार सिंह यांना का धमकावत होता? त्यामागची कहाणीही गंभीर आहे. आदिशक्ती फिल्म या कंपनीचा मालक मनोज मिश्रा यानं राजकुमार सिंह यांच्याकडून साडेआठ कोटी रुपये घेतले होते. हे पैसे मनोज मिश्राला परत द्यायचे नव्हते. त्यामुळं करार तोडण्यासाठी मनोज मिश्रानं प्रकाश सुर्वेंचा मुलगा राज सुर्वे याला सुपारी दिली होती, असा आरोप करण्यात आलाय.
याविषयी राजकुमार सिंह यांनी माहिती दिलीय. “8.30 कोटी दिले आहेत. त्या कंपनीच्या मालकानं करार तोडण्यासाठी सह्या घेतल्या. पोलीस फोन करत होते. ते लोक उचलून देत नव्हते. चुकीचं लोकेशन सांगायला सांगितलं. पुन्हा लोकेशन चेंज केलं. आपल्या मर्जीनं सह्या घेतल्या असं सांगायला सांगितलं”, असं राजकुमार सिंह यांनी सांगितलं.
राज सुर्वेवर गुन्हा दाखल
प्रकरण पोलिसात गेल्यानंतर आरोपी मनोज मिश्रानं मुंबईबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी मनोज मिश्रा, विपुल सिंह, आणि आणखी एकाला मुंबई विमानतळावरुन अटक केली. प्रकाश सुर्वेंचा मुलगा राज सुर्वेवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ठाकरे गटाचा गंभीर आरोप
प्रकाश सुर्वे हे शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार आहेत. हातपाय तोडा, टेबल जामीन मिळवून देतो, या त्यांच्या वाक्यावरुन वाद झाला होता. एका व्हायरल व्हिडीओ प्रकरणातही विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यांचा मुलगा राज प्रकाश सुर्वेसुद्धा अनेक बेकायदा कृत्यांमध्ये सहभागी असतो, असा आरोप ठाकरे गटानं केलाय.
ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी याबाबत गंभीर आरोप केला. “ही पहिलीच घटना नाही, प्रकाश सुर्वे यांच्यावर असे अनेक गुन्हे दाखल आहेत. हातपाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिल्डरची फाईल थांबवली आहे, मुलाला बिल्डरसोबत भागीदारीत घेण्यास सांगितले आहे. पण आता बस झालं आहे, मी पोलिसांना विनंती करतो, आता खूप झाले आहे”, अशी प्रतिक्रिया घोसाळकर यांनी दिली.
ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. आमदार कसे बेलगाम झाले आहेत, कायदा आणि संस्थेची भीती राहिली नाही. मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वाद त्यांना आहेत. यांच्या विरोधात कोणीही आवाज उचलत नाहीय. आम्ही एक कानाखाली मारली तर आमच्या कार्यकर्त्यांना दहा दिवस जेलमध्ये ठेवलं. या आमदारांचं तुम्ही काय करणार? असा सवाल अनिल परब यांनी केला.
दरम्यान, शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. “FIR झाली आहे, पोलीस चौकशी करत आहेत. CCTV समोर आलं आहे. त्यात तो मुलगा नाही. चुकीचं समर्थन करणार नाही”, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.