‘आमच्या आदित्यला पाहिले का हो तुम्ही कुठे?’, भाजपचं खोचक व्यंगचित्र
भाजपकडून व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. हे व्यंगचित्र प्रसाद लाड यांनी ट्विट केलं आहे. "बाळराजे बसले कुठे दडून? मागील काही दिवसांपासून न कुठली प्रेस कॉन्फरन्स ना कुठली सभा", असं प्रसाद लाड ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
मुंबई | 20 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. राज्यात आणि देशभरात आता प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. प्रचाराची ही रणधुमाळी आगामी काळात जास्त तीव्र होण्याची चिन्हं आहेत. सध्या प्रत्येक पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. प्रत्येक पक्षांकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर प्रचाराला जास्त गती मिळणार आहे. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडण्याची एकही संधी सोडताना दिसणार नाहीत. त्याला आतापासूनच सुरुवात झाली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी एक व्यंगचित्र ट्विट केलं आहे. या व्यंगचित्रातून प्रसाद लाड यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
संबंधित व्यंगचित्रात उद्धव ठाकरे यांच्या हातात आदित्य ठाकरे यांचा फोटो दाखवण्यात आलाय. “आमच्या आदित्यला पाहिले का हो तुम्ही कुठे? ऐन निवडणुकीच्या काळात गेले दीड महिने गायब आहे हो…”, असं उद्धव ठाकरे व्यंगचित्रात विचारत असल्याचं दाखवण्यात आलंय. तर इतर दोन जण “दारुण पराभव समोर दिसत असल्यामुळे लपून बसला असेल…”, असं बोलताना व्यंगचित्रात दाखवलं आहे.
बाळराजे बसले कुठे दडून? प्रसाद लाड यांचा टोला
हे व्यंगचित्र ट्विट करत असताना प्रसाद लाड यांनी कॅप्शनमधूनही आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. “बाळराजे बसले कुठे दडून? मागील काही दिवसांपासून न कुठली प्रेस कॉन्फरन्स ना कुठली सभा. बाबांच्या मागे मागे चालणाऱ्या बाळराजांना अहो कुठेतरी शोधा”, असा खोचक टोला प्रसाद लाड यांनी दिला आहे. त्यांच्या या व्यंगचित्रावर आता ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर देण्यात येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ठाकरे गटासाठी निवडणूक महत्त्वाची
आगामी लोकसभा निवडणूक ही ठाकरे गटासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख होते. पण त्यांच्या हातून पक्षाचं नाव आणि चिन्हं देखील हिरावलं गेलं आहे. ठाकरे गट निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांसमोर पार पडलेल्या कायदेशीर लढाईत अयशस्वी ठरले आहेत. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या सर्व घडामोडी पाहता आगामी निवडणुका या ठाकरे गटसाठी जास्त महत्त्वाच्या आहेत.