प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार 1966चे शिवसैनिक आहेत काय?; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
भाजपमध्ये सर्व उपरे भरल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (pravin darekar slams cm uddhav thackeray over dussehra melava speech)
मुंबई: भाजपमध्ये सर्व उपरे भरल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेच्या रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, शंकरराव गडाख आणि अब्दुल सत्तार हे 1966चे शिवसैनिक आहेत का?, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल केला. तुमच्या पक्षातील उपऱ्यांची संख्या आणि भाजपमधील उपऱ्यांची संख्या एकदा जनते समोर येऊ द्या, असं आव्हान देतानाच आजच्या मंत्रिमंडळात कोण आहेत? उदय सामंत, शंकरराव गडाख, अब्दुल सत्तार हे काय 1966 पासूनचे शिवसैनिक आहेत काय? प्रियंका चतुर्वेदी या पदर खोवून आंदोलनात उतरणाऱ्या रणरागिणी आहेत का? उर्मिला मातोंडकर कोण आहेत? या लोकांनी कंबर कसून शिवसेनेसाठी आंदोलने केली आहेत का? मग इतरांना उपरे म्हणणं कितपत योग्य आहे? असा सवाल दरेकर यांनी केला.
370 कलम काढलं ही चूक झाली का?
यावेळी त्यांनी 370 कलमावरून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. 370 कलम हटवूनही जम्मू कश्मीरमध्ये सुधारणा होऊ शकली नाही असं संजय राऊतांचं विधान आहे. मग 370 कलम हटवल्याचा आम्हाला अभिमान आहे असं राऊत म्हणतात ते कशाच्या आधारे? 370 कलम काढलं ही चूक झाली का? तुम्ही जम्मूकश्मीरची काळजी करू नका. अमित शहा सक्षम आहेत. चिनी आक्रमण असेल किंवा कश्मीरची सुरक्षा असेल किंवा सर्जिकल स्ट्राईक असेल… टोकाची धमक असल्यांच त्यांनी दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रात अराजकता आहे. महिला असूरक्षित आहेत. राज्य सरकारला सल्ला देऊन काही कारवाई झाली तर आम्ही तुमचं अभिनंदन करू, असा चिमटाही त्यांनी काढला.
कोण ड्रग्ज, गांजाची पाठराखण करतं सर्वांना माहीत
राज्यात सध्या अत्यंत खालच्या पातळीवरची टीका सुरू आहे. आमचे नेते गांजा घेतात की काय असं बोललं जात आहे. ड्रग्ज, गांजा याची बाजू कोण घेतं हे महाराष्ट्रातील जनतेला नीट माहीत आहे. सुशांतच्या प्रकरणात काय झालं हे सर्वांना माहीत आहे. ते काढायला भाग पाडू नका. कुणाच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी अटक झाली आहे हेही सर्वांना माहीत आहे. कोण गांजा, ड्रग्जची पाठराखण करतं हे सर्वांना माहीत आहे, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.
शिवसैनिकांच्या मनात काय चाललंय हे पाहा
भाजपने पंकजा मुंडे यांचं मत विचारात घ्यावं, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.आता राऊत यांनी पंकजा ताईंचं मत विचारात घ्यायला सांगितलं आहे. पंकजा मुंडे या आमच्या नेत्या आहेत. पक्षात त्यांचं मत विचारात घेऊच. पण काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर शिवसैनिकांत अस्वस्थता पसरली आहे. त्यांचं मत जाणून घेतलं तर सेनेचं हित होईल. अनंत गिते सारखा माणूस काय बोलतो हे पाहावं. त्याकडे बघायला वेळ नाही. मात्र, पंकजाताईंच्या विधानावरून उसन आवसान आणलं जात आहे. शिवसैनिकांच्या मनात काय अस्वस्थता आहे. त्यांच्या मनात काय चाललंय हे त्यांनी पाहावं, असा चिमटाही त्यांनी काढला.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 18 October 2021 https://t.co/kcLRcKFyUf #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2021
संबंधित बातम्या:
लाल चौक ते हिंदुराष्ट्र, कोण आहेत गुरु माँ कांचनगिरी ज्या राज ठाकरेंना भेटण्यासाठी मुंबईत आल्या?
‘सर्वज्ञानी संजय राऊतांचा संताप समजू शकते’, तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन चित्रा वाघांचा जोरदार टोला
(pravin darekar slams cm uddhav thackeray over dussehra melava speech)