मुंबई, ठाणेसारख्या शहरांना भविष्यासाठी तयार करायचं…मोदींना मांडला मुंबईच्या विकासाचा आराखडा
narendra modi mumbai metro 3: मुंबईमधील वाहतूक वाढत होती परंतु त्यावर उपाय काढले जात नव्हते. आमच्या सरकारने ही परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला. मुंबईत ३०० किलोमीटर मेट्रो तयार होत आहे. कोस्टर रोड, अटल सेतूमुळे मुंबईतील पायाभूत सुविधा बदलल्या आहेत.
मुंबईत आम्हाला विकास करायचे आणि काँग्रेसने केलेल्या खड्डे भरायचे आहे. काँग्रेसने केलेल्या या खड्ड्यांमुळे मुंबईचा विकास थांबला होता. मुंबईमधील वाहतूक वाढत होती. परंतु त्यावर उपाय काढले जात नव्हते. आमच्या सरकारने ही परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला. मुंबईत ३०० किलोमीटर मेट्रो तयार होत आहे. कोस्टर रोड, अटल सेतूमुळे मुंबईतील पायाभूत सुविधा बदलल्या आहेत. मुंबईत मेट्रो ३ प्रकल्प देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरु झाले होते. त्यावेळी त्याचे ६० टक्के काम झाले होते. परंतु मविआने अडीच वर्ष हे काम होऊ दिले नाही. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत १४ हजार कोटींनी वाढली. हा पैसा कोणाचा होता. हा पैसा महाराष्ट्राचा होता, असे सांगत नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधाला.
मविआने ही कामे होऊ दिली नाही
मविआने अटल सेतूचा विरोध केला, मुंबई अहमदाबाद ट्रेनचे काम होऊ दिले नाही, मविआने जलयुक्त शिवाय योजनाही गुंडाळली. हे तुमचे काम थांबवत होते. विकास थांबवत होते. आता तुम्हाला त्यांना सत्तेच्या बाहेर ठेवायचे आहे. काँग्रेस भारतातील सर्वात भ्रष्ट पार्टी आहे.
भाषणाची सुरुवात करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, मी ठाण्याच्या भूमीवर कोपिनेश्वरला प्रणाम करतो. मी शिवाजी महाराज, बाबासाहेबांना नमन करतो. आज एक मोठी आनंदाची बातमी घेऊन मी महाराष्ट्रात आलो आहे. केंद्र सरकारने आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. ही केवळ मराठी आणि महाराष्ट्राचाच सन्मान आहे, असे नाही, देशाला ज्ञान, दर्शन, अध्यात्म आणि साहित्याची समृद्धी संस्कृती दिली त्या परंपरेचा हा सन्मान आहे. देश आणि जगातील मराठी भाषिकांचं मी अभिनंदन करतो. नवरात्रीत मला एकानंतर एक अनेक विकास कामाच्या लोकार्पण आणि शिलान्यासाचं सौभाग्य मिळत आहे. ठाण्याच्या आधी वाशिमला होतो. तिथे देशातील साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी दिला. अनेक विकास कामांचं लोकार्पण केले.
काँग्रेस देशातील सर्वात भ्रष्ट पार्टी
काँग्रेस ही सर्वात भ्रष्ट पार्टी आहे. कोणतंही राज्य असो काहीही असो काँग्रेसचं चरित्र बदलत नाही. काँग्रेसच्या एका मुख्यमंत्र्याचं जमीन घोटाळ्यात नाव आलं आहे. त्यांचा एक मंत्री महिलांना शिव्या देतो. हरियाणात एक नेता ड्रग्ससह पकडला आहे. काँग्रेस निवडणुकीत मोठी आश्वासने देते पण सत्तेत आल्यावर लोकांचे शोषण करते. लोकांवर कर लादते. घोटाळ्यासाठी पैसा जमवणं हाच त्यांचा अजेंडा आहे. हिमाचलमध्ये काँग्रेस सरकारने हद्दच केली. काँग्रेसने हिमाचलमध्ये एक नवीन टॅक्स लावला आहे. त्यांनी टॉयलेट टॅक्स लावला आहे.
एकीकडे मोदी म्हणतात टॉयलेट बनवा. आणि दुसरीकडे काँग्रेस त्यावर टॅक्स लावत आहे. कांग्रेस लूट आणि फसवणुकीचं एक पॅकेज आहे. तुमची जमीन हडप करेल, तरुणांना ड्रग्समध्ये ढकलतील आणि महिलांना शिव्या देतील. लूट आणि कुशासनचं पॅकेज ही काँग्रेसची ओळख आहे.