मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई दौरा आहे. मोदी यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. त्यासाठी मुंबई नगरी सज्ज झाली आहे. या निमित्ताने मोदींची वांद्रे येथील बीकेसी मैदानावर मोठी सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनो तुम्ही जर रस्त्याने प्रवास करणार असाल तर एकतर घरातून लवकर बाहेर पडा. नाही तर वाहतूक व्यवस्थेची माहिती घेऊनच बाहेर पडा. नाही तर वाहतूक कोंडीमध्ये फसाल.
भाजप आणि शिंदे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जबरदस्त तयारी केली आहे. मुंबई पोलिसांनीही सभा स्थळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर मोठा बंदोबस्त ठेवला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
घाटकोपर-वर्सोवा मेट्रो आज संध्याकाळी 5.45 ते 7.30च्या दरम्यान बंद राहणार आहे. मुंबईत आज व्हिआयपीची मांदियाळी असणार आहे. त्यामुळे दुपारी 4 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत प्रचंड वाहतूक आणि वर्दळ राहणार असल्याचं चिन्हं आहे. त्यामुळे घरातून निघताना काळजी घ्या.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर मोदींची सभा होत आहे. त्यामुळे बीकेसी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सांताक्रूझ-जोगेश्वरी लिंक रोड, ईस्टर्न एक्सप्रेस रोड आणि अन्य मार्गांवर प्रचंड वाहतूक राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे तर तुम्हाला डोमेस्टिक किंवा इंटरनॅशनल फ्लाइट पकडायची असेल तर घरातून लवकर निघा.
बीकेसी आणि गुंदवली मेट्रो स्टेशनच्या जवळ नियोजित कार्यक्रम असल्याने सवा चार ते साडे पाच वाजेपर्यंत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दक्षिण मुंबईत म्हणजे कुलाबाच्या दिशेने वाहतुकीचा वेग मंद राहील. त्याच पद्धतीने साडेपाच ते पावणे सहापर्यंत उत्तर मुंबईत म्हणजे दहिसरच्या दिशेनेही वाहतुकीचा वेग मंद राहील. मुंबई पोलिसांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे.
मुंबई पोलिसांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. मुंबई वाहतूक विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीवरच लक्ष द्या. त्यामुळे कोणतीही चुकीची माहिती मिळणार नाही आणि संभ्रमही निर्माण होणार नाही. कोणतीही शंका आल्यास मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईन किंवा ट्विटर अकाऊंटवर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, एमएमआरडीए मैदान आणि मेट्रोच्या सात रुटच्या दरम्यान गुंदवली आणि मोगरापाडा स्टेशनच्या दरम्यान ड्रोन, पॅराग्लायडर आणि रिमोट कंट्रोल मायक्रो लाइट एअरक्राफ्टच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. मोदींच्या दौऱ्यांशी संबंधित सर्व परिसर नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस टीमचे सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच पाच पोलीस उपायुक्त तैनात राहणार आहेत. त्यांच्यासोबत 27 एसीपी, 171 पोलीस निरीक्षक आणि 397 अधिकारी तैनात राहणार आहेत. जवळपास 2500 पोलीस तैनात राहणार आहेत. त्यात 600 महिला पोलिसांचा समावेश आहे.
त्याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकड्या, दंगल नियंत्रक पथकाची एक तुकडी आणि रॅपिड अॅक्शन फोर्सही तैनात करण्यात आली आहे. या सर्वांची कमांड मुंबई पोलीस आयुक्तांच्या हातात असेल. त्यांच्या सोबत इतर अधिकारीही असतील.