विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण?; उद्या अर्ज भरणार!
काँग्रेसमधील विधानसभा अध्यक्षपदाचा पेच अखेर सुटला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव नक्की झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.
मुंबई: काँग्रेसमधील विधानसभा अध्यक्षपदाचा पेच अखेर सुटला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव नक्की झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. उद्या चव्हाण विधानसभा अध्यक्षपदासाठीचा अर्जही भरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या 27 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरायचा असून 28 डिसेंबर रोजी अध्यक्षांची निवड होणार आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला आलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपद कुणाकडे देणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. काँग्रेसमधून एकाचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, यात पृथ्वीराज चव्हाणांचं नाव या पदासाठी फिक्स झाल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं.
आघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार
दरम्यान, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी या नेत्यांनी अर्धा तास चर्चा केली. राज्यपालांनी सरकारच्या प्रस्तावावर चर्चा करून उद्या निर्णय कळवणार असल्याचं सांगितल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे. राज्यपाल सकारात्मक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
कोण आहेत पृथ्वीराज चव्हाण?
पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदोरचा. कऱ्हाडच्या नगरपालिकेच्या शाळेत त्यांचं सातवीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कराडच्या ज्या टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्याच शाळेत इयत्ता आठवीला प्रवेश घेतला. त्यानंतर पुढील शिक्षण दिल्लीत झालं. त्यांनी राजस्थानच्या बीआयटीस पिलानीमधून बीई-ऑनर्सची पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. बर्कलेमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एमएसची पदवी घेतली. त्यानंतर एअरोनॉटिकल क्षेत्रात त्यांनी काही काळ नोकरीही केली. पृथ्वीराज चव्हाण यांना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला होता. त्याचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही काँग्रेसचे खंदे समर्थक होते. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच राजकारणाचं बाळकडू घरातून मिळालं. त्यांचे वडील इंदोरच्या होळकर संस्थानमध्ये कायदा सल्लागार होते. ते जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातही होते.
राजकीय कारकिर्द आणि मुख्यमंत्रीपद
1991-1995, 1995-1998 या काळात ते लोकसभेचे सदस्य होते. ते कराड लोकसभा मतदारसंघातून तीनदा विजयी झाले आहेत. त्यांना सायन्स व टेक्नॉलॉजीच्या मंत्रालयाचे सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर 1992-93मध्ये ते इलेक्ट्रॉनिक अॅटोमिक एनर्जी मंत्रालयाचे सल्लागार सदस्य होते. 1994-1996मध्ये त्यांनी विज्ञान, माहिती व तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन खात्याच्या मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं. 1998-99मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर 2002मध्ये त्यांची पुन्हा राज्यसभा सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी अर्थ नियोजन समितीचे सल्लागार सदस्य, संरक्षण मंत्रालयाच्या समितीचे सल्लागार सदस्य म्हणून काम पाहिले होते. 2000-2001मध्ये ते काँग्रेसचे प्रवक्तेही होते. त्यानंतर 2004 ते 2009पर्यंत ते पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री होते.
पृथ्वीबाबांनी 11 नोव्हेंबर 2010 रोजी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 28 एप्रिल 2011 रोजी ते विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. चार वर्षे ते मुख्यमंत्रीपदी होते. 26 सप्टेंबर 2014 मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 26 December 2021https://t.co/GYmfswHcd8 | #AjitPawar | #Mumbai | #Maharashtra |
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 26, 2021
संबंधित बातम्या:
कोंबड्याना मांजर करून कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का?; अजित पवारांनी नितेश राणेंना फटकारले
प्रकाश आंबेडकर हे ‘रिपब्लिकन’ नाहीत, जोगेंद्र कवाडे यांचं रिपाइं ऐक्यावरही मोठं विधान