रेल्वेत महिलांच्या कोचमध्ये महिला सुरक्षित नाहीत, धावत्या रेल्वेत दिला धक्का
Crime News : रेल्वेत महिलांसाठी विशेष कोच असतो. एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षा मिळावी, हा त्यामागे उद्देश असतो. परंतु रेल्वेत महिलांच्या डब्यात महिला सुरक्षित नसल्याची घटना समोर आली आहे. धावत्या रेल्वेत महिलेला धक्का दिला गेला आहे.

मुंबई | 8 ऑगस्ट 2023 : पुणे-मुंबईमधील एक्स्प्रेसमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यावरुन निघालेल्या या गाडीत महिला कोचमधून प्रवास करणाऱ्या महिलेला धावत्या रेल्वेत धक्का दिला गेला आहे. यामुळे महिला रेल्वे स्थानकावर पडली अन् जखमी झाली. या घटनेतील आरोपीला रेल्वे पोलिसांनी पकडले आहे. या घटनेमुळे महिला त्यांच्यासाठी असलेल्या कोचमध्येही सुरक्षित नाही का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच महिलांच्या कोचमधून पुरुषाने प्रवास केला कसा? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काय आहे प्रकार
पुणे रेल्वे स्थानकावरुन २९ वर्षीय महिला मुंबईला येत होती. ६ ऑगस्ट रोजी ती महिला लेडीच कोचमधून प्रवास करत होती. रेल्वेत एक पुरुष महिलेला त्रास देत होतो. त्या महिलेने बचाव करण्याचा प्रयत्न केल्यानंतर धावत्या रेल्वेतून दादार रेल्वे स्थानकावर तिला धक्का दिला. या घटनेत ती महिला रेल्वे स्थानकावर पडली. तिला अनेक ठिकाणी जखमा झाल्या. या प्रकारानंतर रेल्वे पोलिसांनी तपास सुरु केला. आरोपीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर अटक करण्यात आली.
आरोपीची ओळख लपवली
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. परंतु आरोपीची ओळख लपवण्यात आली. दादार जीआरपीने आरोपीविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु कोणत्या कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे, याबाबत अद्याप खुलासा करण्यात आला नाही.




पोलिसांनी काय म्हटले
पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, दादर रेल्वे स्थानकावर एका २९ वर्षीय महिलेला रेल्वेतून बाहेर ढकलले गेले. त्यात ती स्थानकावर पडली अन् जखमी झाली. उद्यान एक्स्प्रेसमध्ये ६ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. आरोपीने महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु महिलेने विरोध करताच तिला धावत्या गाडीतून धक्का दिला. पोलिसांनी आरोपीला सीएसएमटी स्टेशनवर अटक केली.
या प्रकारामुळे रेल्वेत महिलांच्या कोचमधून पुरुष प्रवास करत असल्याची बाब समोर आली. महिलांच्या डब्यात पुरुष प्रवास करत असताना कारवाई का होत नाही? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.