लोकसभेतील राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या विधान परिषदेत उडाला भडका
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज संसदेत बोलताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपवर टीका केली. टीका करत असताना त्यांनी हिंदू लोकांचा अपमान केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. पण त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतही पाहायला मिळाले.
लोकसभेत भाजपवर निशाणा साधताना, राहुल गांधींनी हिंदुत्वावरुन भाष्य केलं. त्यावरुन महाराष्ट्राच्या विधान परिषदेत भाजपचे प्रसाद लाड आणि दानवे आमने-सामने आले. दानवेंनी भर सभागृहात शिवीगाळ केली. लोकसभेत भाजपवर निशाणा साधताना राहुल गांधींच्या हिंदूत्वाच्या वक्तव्यावरुन गदारोळ झाला आणि इकडे महाराष्ट्राच्या विधान परिषदेत असा काही भडका उडाला.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी, भाजपच्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. प्रकरण शिवीगाळपर्यंत गेल्यानंतर, विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हेंनी सभागृह स्थगित केलं. मात्र सभागृहाच्या बाहेर आल्यानंतर, मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर पुन्हा शाब्दिक चकमक उडाली.
भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी, दानवेंच्या राजीनाम्याची मागणी करत सभागृह न चालू देण्याचा इशारा दिला. आता लोकसभेत राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते. तेही समजून घेवूया.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना संविधान वाचवण्याच्या मुद्दयावरुन घेरत असताना राहुल गांधींनी देव देवतांचे पोस्टर दाखवले. शिवजींचं पोस्टर दाखवलं. गुरु नानकजी, कुराणचंही पोस्टर दाखवलं. सर्वांनी अहिंसेचा मार्ग दाखवला. मात्र भाजपकडे इशारा करताना हिंदूत्वावरुन हिंसेंचा आरोप केला. यानंतर गृहमंत्री अमित शाह आक्रमक झाले. राहुल गांधींच्या माफीची मागणी अमित शाहांनी केली.
राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर ते पहिल्यांदाच लोकसभेत बोललेत. मात्र भाजपवर जरी निशाणा असला. तरी हा सर्व हिंदू समाजाचा अपमान असल्याचा आरोप मोदी, शाहांपासून भाजपनं केलाय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रथम राहुल यांच्यावर सभागृहात हल्लाबोल केला आणि नंतर सोशल मीडिया ‘X’ वरील पोस्टमध्ये म्हटले की, “हिंदू हिंसा करतात, खोटे बोलतात आणि द्वेष पसरवतात. असे बोलून राहुल गांधींनी कोट्यवधी हिंदूंचा अपमान केला आहे. त्यांनी याबद्दल माफी मागितली पाहिजे.”
जेपी नड्डा म्हणाले की, ‘गेल्या 60 वर्षात कधीच सलग तीन वेळा विरोधकांना नाकारले गेले नाही. ते ज्या मार्गावर जात आहेत, ते आगामी काळात त्यांचेच विक्रम मोडतील. राहुल गांधीजींनी तत्काळ सर्व हिंदूंना हिंसक म्हटल्याबद्दल माफी मागावी. हा तोच माणूस आहे जो परदेशातील मुत्सद्दींना हिंदू दहशतवादी असल्याचे सांगत होता. हिंदूंबद्दलचा द्वेष थांबला पाहिजे.”