Rahul Narwekar : आता राजधानी दिल्लीत खलबतं, विधानसभा अध्यक्ष दिल्लीला जाणार; कुणाकुणाशी होणार गाठीभेटी?
आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता कामाला लागले आहेत. येत्या आठवडाभरात काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
मुंबई | 21 सप्टेंबर 2023 : आमदारांच्या अपात्रते संदर्भात एका आठवड्यात सुनावणी घ्या आणि दोन आठवड्यानंतर काय कार्यवाही केली याची माहिती द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. तसेच चार महिन्यात काहीच कारवाई न केल्याबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या वेळकाढूपणावर तीव्र शब्दात नाराजी केली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष कामाला लागले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नार्वेकर दिल्लीत कुणाला भेटणार? दिल्लीत काय खलबतं होणार? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
राहुल नार्वेकर हे तातडीने दिल्लीला रवाना होणार आहेत. नार्वेकर आजच दिल्लीला जाणार आहेत. कोर्टाने अपात्र आमदारांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आदेश नार्वेकर यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नार्वेकर हे दिल्लीला जात असल्याचं सांगितलं जात आहे. नार्वेकर दिल्लीत ज्येष्ठ कायदे तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. कायदेतज्ज्ञांशी बोलूनच ते पुढील निर्णय घेणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे नार्वेकर यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर नार्वेकर यांचा हा दौरा पूर्व नियोजित असल्याचंही सांगितलं जात आहे.
ठाकरे, शिंदेंना नोटीसा
दरम्यान, नार्वेकर येत्या एक दोन दिवसात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस बजावणार असल्याचं सांगितलं जात आहे. आमदार अपात्रतेच्या संबंधी ही नोटीस बजावली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे हे काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, नार्वेकर येत्या दोन ते तीन दिवसात कोर्टाच्या गाईडलाईननुसार सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. आठवडाभरात आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निपटारा करण्याचा नार्वेकर यांचा कल असल्याचंही सांगितलं जात आहे.
आमची बाजू भक्कम
दरम्यान, आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रया व्यक्त केली आहे. एक-दोन दिवसांमध्ये आम्हालाही नोटीस येतील. या नोटिशींना आम्ही उत्तर देणार आहोत. आमची बाजू भक्कम आहे, असं आम्ही यापूर्वी म्हणालो होतो. आताही तेच म्हणतोय, असं संजय शिरसाट म्हणाले.
आदेशाचं पालन करू
कायदे तज्ज्ञांची चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला जात आहेत. तिथे ते कायदेतज्ज्ञ जे मार्गदर्शन करतील त्यानुसार या ठिकाणी कारवाई करतील. यापूर्वीच त्यांनी दोन आठवड्याची वेळ दिली होती. पण घाई जास्त आहे. पण आम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करू. आम्हाला जे मांडायचं आहे, ते मांडू, असंही शिरसाट यांनी सांगितलं.