रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वसूल केले तब्बल इतके कोटी
पश्चिम रेल्वे विभागाने एप्रिल 2023 ते मार्च 2024 पर्यंत अनेक तिकीट तपासणी मोहीम राबवून करोडो रुपये वसूल केले आहेत. यामध्ये मुंबई उपनगरीय विभागातून मिळालेल्या 46.90 कोटी रुपयांचाही समावेश आहे.
Railway : देशात कुठे फिरायला जायचे असेल तर लोकं आरामदायी प्रवासासाठी नेहमीच भारतीय रेल्वेचा वापर करतात. भारतीय रेल्वेचा प्रवास हा तसा परवडणारा असतो. त्यामुळेच लवकर तिकीट देखील मिळत नाही. रेल्वेतून तुम्ही योग्य तिकीट घेऊन प्रवास केला तर तुम्हाला कुठल्याच अडचणींचा सामना करावा लागत नाही. पण जर चुकीचे तिकीट घेऊन प्रवास करत असाल किंवा तिकीटच काढले नसेल तर रेल्वे अशा प्रवाशांवर कारवाई करण्यापासून थांबत नाही. यासाठी रेल्वेकडून सतत जनजागृती देखील होत असते. विना तिकीट ट्रेनने प्रवास करणे चुकीचे तर आहेच, पण तो कायदेशीर गुन्हाही आहे. ज्यासाठी दंड, तुरुंगवास किंवा दोन्हीची तरतूद आहे.
मुंबईत उपनगरीय लोकल सेवा देखील खूप महत्त्वाची आहे. दररोज लाखो लोकं या लोकल सेवेने प्रवास करत असतात. रेल्वेकडून अनियमित प्रवाशांना आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते.
पश्चिम रेल्वेवर तिकीट तपासणी पथकाद्वारे एप्रिल 2023 ते मार्च 2024 पर्यंत अनेक तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. ज्यातून रेल्वेने तब्बल 173.89 कोटी रुपये वसूल केले आहेत. त्यापैकी 46.90 कोटी रुपये मुंबईतून वसूल झाले.
पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मार्च 2024 मध्ये बुक न केलेल्या सामानासह 2.75 लाख तिकीटविहीन/अनियमित प्रवाशांकडून 16.77 कोटी रुपये वसूल करण्यात आले. याव्यतिरिक्त, मार्च महिन्यात, पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात 1 लाखांहून अधिक प्रकरणे शोधून काढल्यानंतर 4.80 कोटी रुपयांचा दंड वसूल केला.
60 हजारांहून अधिक लोकांना दंड
एसी लोकल गाड्यांमधील अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी नियमित तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. या मोहिमेचा परिणाम म्हणून, एप्रिल, 2023 ते मार्च, 2024 या कालावधीत अंदाजे 60,000 अनधिकृत प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला. ज्यामधून देखील करोडो रुपये रुपयांचा रुपये दंड वसूल करण्यात आले, जे मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 25% अधिक आहे.