Rain : विदर्भात पावसाला सुरुवात, पुढील चार दिवस यलो अलर्ट
IMD Weather forecast : राज्यात पावसाने दडी मारली होती. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत राज्यात अपवाद वगळता पाऊस झाला नव्हता. आता विदर्भापासून पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भात हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : अधिकमासनंतर आता श्रावण महिना सुरु झाल्यानंतर राज्यात विदर्भात पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी विदर्भातील अनेक भागांत पावसाचे आगमन झाले आहे. राज्यात पावसाने मोठा ब्रेक घेतला होता. त्यानंतर पाऊस आता सुरु झालेला आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस विदर्भाला यलो अलर्ट दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता संपणार आहे. विदर्भासह मराठवाडा आणि खान्देशात शनिवारी पावसाचा यलो अलर्ट आहे. जळगाव, औरंगाबाद, नांदेड, परभणीसह संपूर्ण विदर्भात १९ ऑगस्ट रोजी यलो अलर्ट दिला आहे.
विदर्भात पावसाला सुरुवात
विदर्भात १५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नागपुरात पावसाला सुरुवात झाली. नागपूरसह विदर्भात सर्वदूर पावसाने शुक्रवारी हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. परंतु आता पाऊस परतल्याने पिकांना जीवनदान मिळाले आहे. हवामान विभागाने पुढील पुढील चार दिवस पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यात सर्वाधिक पावसाचा ब्रेक
राज्यात 1972 मध्ये सर्वाधिक पावसाचा ब्रेक झाला होता. त्यावेळी 18 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान पाऊस नव्हता. आता 1 ते 17 ऑगस्टपर्यंत पाऊस नव्हता. त्यामुळे 1972 नंतर हा सर्वाधिक पावसाचा ब्रेक आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून भंडाऱ्यात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पंधरा दिवस पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होता.
मराठवाड्यात बिकट परिस्थिती
पावसाअभावी मराठवाड्यात पिकांची वाढ खुटंली आहे. पाऊस नसल्यामुळे काही भागांतील शेतकऱ्यांनी आपल्या कापसावर ट्रॅक्टर फिरवला आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातल्या हडोळती येथील अरुण गोरे या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर कापूस काढून टाकला आहे.
आता पाऊस परतणार
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून खंडित झालेला पाऊस राज्यात पुन्हा परतणार आहे. शुक्रवारपासून विदर्भ, मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात पुन्हा पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.