राजभवनाला कोणताही निधी मिळाला नाही, सोमय्यांच्या जामिनाला विरोध; सरकारी वकील घरत यांची माहिती
सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले की, सोमय्यांनी जमा केलेली रक्कम कुठे गेली याचा पोलिसांना तपास करायचा आहे. या चौकशासाठी आरोपीची कोठडी हवी आहे. मात्र, आरोपी म्हणतायत आम्ही हा पैसा आमच्या पक्षाकडे दिला आहे. या सगळ्या प्रकारात पक्ष जर आरोपी आढळला तर पक्षाच्या नेत्यावर पण कारवाई करणायात येईल.
मुंबईः सेव्ह विक्रांत (vikrant) मोहिमेंतर्गत गोळा केलेला कोणताही निधी राजभवनाला मिळाला नाही. त्यामुळे हा पैसा गेला कुठे हा मोठा प्रश्न आहे. त्याचे स्पष्ट उत्तर त्यांना देता आले नाही. त्यामुळे किरीट आणि नील सोमय्यांच्या जामिनाला विरोध केल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. याप्रकरणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या (Neil Somaiya) यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी सोमय्यांच्या जामिनाला विरोध केल्याची माहिती सरकारी वकिलांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे सोमय्यांना जामीन मिळणार की नाही, याची उत्सुकता लागली आहे.
काय म्हणाले घरत?
सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले की, सोमय्यांनी जमा केलेली रक्कम कुठे गेली याचा पोलिसांना तपास करायचा आहे. या चौकशासाठी आरोपीची कोठडी हवी आहे. मात्र, आरोपी म्हणतायत आम्ही हा पैसा आमच्या पक्षाकडे दिला आहे. या सगळ्या प्रकारात पक्ष जर आरोपी आढळला तर पक्षाच्या नेत्यावर पण कारवाई करणायात येईल, असा इशाराही यावेळी घरत यांनी दिला आहे.
नेमका आरोप काय?
संजय राऊत यांनी सोमय्यांवर आरोप केले होते. सोमय्या यांनी सेव्ह विक्रांतच्या नावाखाली निधी गोळा केला होता. 11 बॉक्स भरून हा निधी गोळा केला होता. मुलुंडच्या निलम नगरमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी हा निधी ठेवला होता. नंतर काही बॉक्स एका बिल्डरच्या कार्यालयात ठेवला. सोमय्यांनी हा निधी मुलाच्या उद्योगात वापरल्याचा दावा राऊत यांनी केला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तसेच काही जणांचे कबुली जवाबही नोंदवले गेले आहेत.
पत्र टीव्ही 9च्या हाती
सेव्ह विक्रांत मोहीमप्रकरणी सोमय्यांनी राज्यपालांना लिहिलेले एक पत्र टीव्ही 9 मराठीच्या हाती लागले आहे. या पत्रात सोमय्या यांनी सेव्ह विक्रांतच्या मोहिमेतून 11 हजार 224 रुपयांचा निधी जमा झाल्याची माहिती राज्यपालांना दिली आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी सोमय्यांवर केलेला 58 कोटींच्या घोटाळ्याचा सोमय्यांवर केलेला आरोप खरा की खोटा? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. त्यावर आता राऊत काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.