राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर चर्चा तर होणारच. कारण दोन्ही नेत्यांचं राजकारणात मोठं वजन आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी अनेक जणांकडून प्रयत्न झाले पण तसे होऊ शकलेले नाही. राजकीय व्यासपीठावर एकत्र नसले तरी कौटुंबिक कार्यक्रमात दोघे एकत्र येत असतात.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र नसले तरी आज एका कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र आले होते. एका खासगी कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकाच फ्रेममध्ये दिसले. आज राज ठाकरे यांच्या भाच्याचा साखरपुडा पार पडला. ज्यात दोन्ही भाऊ उपस्थित होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचीही भेट
मुंबईतील दादर येथील एका सभागृहात हा साखरपुडा पार पडला, ज्यात संपूर्ण ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली. साखरपुड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांमध्ये संवाद झाला. यावेळी रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचीही भेट झाली.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींमुळे दोन्ही भावांनी एकमेकांवर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी अदानी समुहाला धारावी प्रकल्प दिल्याने मोर्चा काढला होता. यावरुन राज ठाकरे यांनी त्याच्यावर टीका केली होती.
धारावी प्रकल्प म्हणजे काय?
धारावी ही सुमारे 2.8 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला झोपडपट्टी आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स जवळ असल्यामुळे या ठिकाणाची किंमत खूप जास्त आहे. येथे अनेक छोटे उद्योग आहेत, जे एक लाख लोकांना रोजगार देतात. प्रकल्पांतर्गत येथे उंच इमारती आणि इतर अनेक प्रकारची कामे केली जाणार आहेत. 2004 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पांतर्गत 68 हजार लोकांचे अन्यत्र पुनर्वसन करण्याची योजना आहे. त्यासाठी त्यांना तयार घरांचे आश्वासन देण्यात आले आहे. सन २०११ मध्ये सरकारने येथील निविदा रद्द केली. नंतर पुन्हा निविदा काढण्यात आल्या. हा प्रकल्प अदानी समूहाच्या कंपनीला देण्यात आल्याने ठाकरे गटाकडून आता विरोध होत आहे.