राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द करण्याच्या पापात भाजप, मनसेच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; भाजप आणि मनसेत बिनसतंय?
शरद पवारांच्या मनात बाळासाहेबांनी जवळ केले नाही याचा राग होता. तर केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही म्हणून संजय राऊत नाराज होते. त्यामुळे या दोघांनी शिवसेनेचे वाटोळे केले.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. मोदी केवळ गुजरातकडेच लक्ष देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. राज ठाकरे यांची ही टीका ताजी असतानाच मनसेच्या आणखी एका नेत्याने भाजपवर टीका केली आहे. राज ठाकरे यांचा अयोध्येचा दौरा रद्द होण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोपच या नेत्याने केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच मनसे आणि भाजपमध्ये बिनसलं की काय? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी हा आरोप केला आहे. राज ठाकरेंनी हिंदूत्वाची भूमिका स्वीकारली तेव्हा भाजपाच्या एका टिनपाट गुंडाने अयोध्येत न येण्याची धमकी दिली. तेव्हा ही लोकं गप्प होती. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द करण्याच्या पापात महाराष्ट्र भाजप सामिल आहे, असा आरोपच त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी एवढ्या थराला जातेय की भावा भावत भांडण लावते. आता नवीन राज्य आल्यानंतर सर्व लोक शिवतीर्थवर येतात. मात्र या सरकारला काही वाटत नाही की राज ठाकरेंवर असलेल्या खोट्या केसेस मागे घ्याव्यात. जर राज ठाकरे यांच्यावरील केसेस मागे घेतल्या नाही तर या शिंदे-फडणवीस सरकारला त्यांची जागा दाखवून देवू, असा इशारा महाजन यांनी दिला.
भाजपात सर्वच आलबेल आहे असे नाही. त्यांनीच त्यांचे काही आमदार पाडले. त्यांचे काही आमदार कमी आले हे लक्षात येताच शरद पवार यांनी लक्ष घातले. शरद पवारांना दिल्लीत कुणी महत्व देत नाही. शरद पवारांच्या पे रोलवर असलेल्या संजय राऊत आणि पवारांनी मिळून वाघिणीला पटवले आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले, असा दावा त्यांनी केला.
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना शब्द दिला होता की सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल. मात्र तसं झालं नाही. माऊलीला(रश्मी ठाकरे) मुलाला मंत्री करायचे होते, त्यासाठी त्यांनी नवऱ्याला मुख्यमंत्री केले.
ज्या बाळासाहेबांनी शरद पवारांना घरी मासे खाऊ घातले, मात्र राजकीय संबध केले नाही. त्या शरद पवारांच्या गळ्यात हात उद्धव ठाकरेंनी हात घातला, अशी टीका त्यांनी केली.
शरद पवारांच्या मनात बाळासाहेबांनी जवळ केले नाही याचा राग होता. तर केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही म्हणून संजय राऊत नाराज होते. त्यामुळे या दोघांनी शिवसेनेचे वाटोळे केले, असा आरोप त्यांनी केला.
ते नेहमी म्हणतात की माझा बाप पळवला, मात्र मी प्रश्न विचारतो की जेव्हा मुंबईत पूर आला होता तेव्हा हा तू कुठे होता हे सांग आधी? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता केला.