Raj Thackeray Effect : राज ठाकरे इफेक्ट, नाशिकचा पॅटर्न महाराष्ट्रभर राबवण्याची तयारी, गृहमंत्र्यांची डीजींसोबत बैठक, एसपी, आयुक्तांना आदेश
भोग्यांवरून टिपेला पोहचलेल्या राजकारणात राज्य सरकारला नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या पॅटर्नने दिलासा दिलाय. हा पॅटर्न कायद्याच्या कसोटीवर टीकणारा आहे. यातून कोणाची धार्मिक भावना दुखावणार नाही, नियम आणि कायद्याचेही पालन होणार आहे. त्यामुळे हाच सुवर्णमध्य आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील काढणार असल्याचे समजते.
मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) करून दाखवलं, असं म्हणण्याची वेळ आता आलीय. त्याला कारण म्हणजे राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर सामाजिक वातावरण गढूळ होऊ नये म्हणून नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी एक आक्रमक, पण सावध भूमिका आणि पॅटर्न निवडला. त्यानुसार सर्व धार्मिक स्थळांसह सर्व ठिकाणच्या भोंग्यासंबंधी परवानगी घेणे बंधनकारक केले. शिवाय तो आदेश तातडीने लागू केला. आता हाच पॅटर्न महाराष्ट्रभर राबवण्याची तयारी राज्य सरकारचा गृह विभाग करतोय. त्यामुळे राज्यातील कोणत्याही धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर हा योग्य परवानीनेच करता येणार आहे. यासंबंधी निर्णय आज होण्याची शक्यता आहे. त्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांची आज डीजीपींसोबत एक बैठक होणार आहे. त्यात ते सर्व आढावा घेऊन सर्व पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांना याबाबत योग्य तो निर्देश देणार आहेत.
नाशिकचा पॅटर्न काय?
नाशिकमध्ये कुठलेही भोंगे लावण्यासाठी सर्व धार्मिक स्थळांनी आणि इतरांनीही येत्या 3 मे पर्यंत परवानगी घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करून हे भोंगे काढले जातील, असे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिलेत. मशीद, मंदिर, गिरीजाघर, चर्च, गुरुद्वारा सर्वच धार्मिक स्थळांसाठी हे आदेश लागू आहेत. या साऱ्या प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्यासाठी परवानगी घ्यायला 3 मे पर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर जिथे परवानगी नाही, तिथे पोलिसांच्या वतीने जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय सर्व ठिकाणी नियमानुसार ध्वनिप्रदूषणाची मर्यादा पाळण्याचा कडक बंधक करण्यात आला आहे.
शिक्षा किती आहे?
ज्या-ज्या ठिकाणी मशिदी आहेत, तिथे पाचवेळा अजान होतो. याच्या वेळा ठरलेल्या आहेत. अजानच्या वेळेपूर्वी पंधरा मिनिटे आणि त्या काळात मशिदीच्या शंभर मीटरच्या आत दुसऱ्यांना ध्वनिप्रदूषण करता येणार नाही. यातला कुठलाही नियम मोडला, तर 4 महिने ते 1 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. त्यात दंड वेगळा असेल. तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तडीपारी होऊ शकते. 6 महिन्यांसाठी अटक होऊ शकते.
Use of loudspeakers at religious sites in the state to be allowed only with due permission: Maharashtra Home Department
State Home Minister Dilip Walse Patil will hold a meeting with the DGP today to instruct him to direct all police commissioners & officers on this.
— ANI (@ANI) April 18, 2022
पुढे काय होणार?
नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी राबविलेला पॅटर्न राज्यभर राबण्याचा विचार गृह मंत्रालय करते आहे. कारण मुस्लीम समाज, मर्कज संस्था, शासन निर्णय, सुप्रीम कोर्टाचा 18 जुलै 2005 रोजीचा निर्णय, विशेष शाखा लॉ ऑर्डर रिपोर्ट हे सारे लक्षात घेऊनच दीपक पांडेय यांनी हा भोंग्यासंबंधीचा आदेश दिला आहे. तो कायद्याच्या कसोटीवर टीकणारा आहे. यातून कोणाची धार्मिक भावना दुखावणार नाही, नियम आणि कायद्याचे पालनही होणार आहे. हाच सुवर्णमध्य आता राज्य सरकार काढणार असल्याचे समजते.