‘किंबहुना’ वापरलं तर चालेल ना; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या शैलीवर मिश्किल टिप्पणी
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात 'किंबुहना' शब्दाचा बऱ्याचदा वापर करताना दिसतात. | Raj Thackeray Uddhav Thackeray
मुंबई: राज्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाषणाच्या शैलीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हळुवार चिमटा काढला. पत्रकारपरिषदेला सुरुवात करताना राज ठाकरे यांनी, ‘मी किंबहुना वापरलं तर चालेल ना?’, असा मजेशीर प्रश्न विचारला. (MNS chief Raj Thackeray press conference in Mumbai)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांशी संवाद साधला आहे. यावेळी उद्धव ठाकरे आपल्या भाषणात ‘किंबुहना’ शब्दाचा बऱ्याचदा वापर करताना दिसतात. यावरुन सोशल मीडियावर बरीच मिम्सही व्हायरल झाली होती. आज पत्रकारपरिषदेला सुरुवात करताना राज ठाकरे यांनी किंबहुना शब्द उच्चारला. त्यानंतर त्यांनी थोडावेळ थांबून ‘मी किंबहुना वापरलं तर चालेल ना?’, असा प्रश्न विचारला.
उद्धव ठाकरे सकारात्मक वाटले: राज ठाकरे
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकारपरिषदेत उद्धव ठाकरे यांच्या कोरोनासंदर्भातील उपाययोजना सकारात्मक असल्याचे म्हटले. प्रसारमाध्यमांनी कोरोनासंदर्भातील खरी परिस्थिती दाखवावी. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. एकतर बाहेरच्या राज्यांमधून महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणावर लोक येत आहेत. दुसऱ्या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे देशात फक्त महाराष्ट्रातच कोरोना रुग्णांची संख्या जास्त दिसत आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
‘अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता, महत्त्वाचा विषय तर ‘तो’ आहे’
माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता. विषय होता मुकेश अंबानींच्या घराखाली पोलिसाने बॉम्बची गाडी ठेवली, त्याची चौकशी होणार आहे का? विषय हा आहे बॉम्बची गाडी पोलिसांनी ठेवली ती कुणाच्या सांगण्यावरुन ठेवली? पोलीस कुणीतरी सांगितल्याशिवाय असं कृत्य करणार नाही. पण चौकशी अनिल देशमुखांची होईलच, पण ही गाडी कुणाच्या सांगण्यावरुन ठेवली याची चौकशी व्हावी. विषयाला फाटा नको. मूळ विषय भरकटत जातो आणि कशापासून सुरु होतो हे आपण पाहातच नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
संबंधित बातम्या:
Raj Thackeray PC LIVE : दहावी-बारावी विद्यार्थ्यांना प्रमोट करा, राज ठाकरे यांची पत्रकार परिषद
महाराष्ट्रात कोरोना का वाढला?; राज ठाकरे यांनी सांगितली दोन कारणं!
(MNS chief Raj Thackeray press conference in Mumbai)