Raj Thackeray : ‘त्यांची डोकी त्यांना खाजवू द्या’, राज ठाकरे यांचा शिंदे-ठाकरे गटावर निशाणा
"महाराष्ट्राचा सध्या सगळ्या बाजूने खोळंबा झालाय. त्यामुळे नक्की काय होणार? या गटाला मान्यता मिळणार की नाही मिळणार? यांची निशाणी मिळणार की नाही मिळणार? त्यांची डोकी त्यांना खाजवू द्या", असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला.
मुंबई : “कोरोनामुळे निवडणूक लांबवल्या गेल्या. या वर्षी मार्चमध्ये निवडणूक होतील, असं वाटत होतं. पण मला वातावरणात निवडणूक दिसत नाही. फेब्रुवारी-मार्चमध्ये लागेल, अशी चर्चा आहे. पण वातावरण तसं दिसत नाहीय. महाराष्ट्राचा सध्या सगळ्या बाजूने खोळंबा झालाय. त्यामुळे नक्की काय होणार? या गटाला मान्यता मिळणार की नाही मिळणार? यांची निशाणी मिळणार की नाही मिळणार? त्यांची डोकी त्यांना खाजवू द्या”, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला.
मुंबईत नेस्को सेंटरमध्ये आज राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यात राज ठाकरे गटप्रमुखांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. यावेळी ते निवडणुकीविषयी बोलत होते.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
जमलेल्या माझ्या मुंबईतील सर्व गटाध्यक्ष बांधव आणि बघिनींनो, बरेच दिवस मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगरमध्ये गटाध्यक्षांचे मेळावे घ्यावेत असं चाललं होतं. कारण अनेकवेळा तुम्ही विभाग अध्यक्षांबरोबर येता पण मला आज फक्त गटाध्यक्षांसाठी मेळावा लावायचा होता. याचं कारण गटाध्यक्ष म्हणजे एका बुथचा प्रमुख.
तुम्ही ज्यावेळेला सोसायटीत, परिसरात जात असतो त्यावेळी तो महाराष्ट्र सैनिक नसतो, लोकांशी संपर्क साधणारा माझा राज ठाकरे असतो. म्हणून काही विषय झाले असतील, निवडणुकीच्या दृष्टीकोनाने काही गोष्टी सांगितल्या गेल्या असतील. या मेळाव्यानंतर विधासभा अध्यक्षांचे मेळावे होतील. कारण कोरोनामुळे निवडणूक लांबवल्या गेल्या. या वर्षी मार्चमध्ये निवडणूक होतील, असं वाटत होतं. पण मला वातावरणात निवडणूक दिसत नाही.
काही गोष्टी मी तुम्हाला मुद्दामून सांगणं आवश्यक आहे. मनसे स्थापन होऊन १६-१७ वर्षे झाली. या वर्षांत आपण जी आंदोलन केली त्यांचा आपण यशस्वी होण्याचा स्ट्राईक रेट पाहिला तर आपल्या आंदोलनांना सर्वात जास्त यश आलेलं आहे. पण काही यंत्रणा चालू असतात, काही यंत्रणा राबवले असतात जेणेकरुन मनसेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे जे आंदोलन होतील ते लोकांच्या विस्मरणात कधी जातील यासाठी यंत्रणा कार्यरत आहेत.
टोलचं ज्यावेळेला आंदोलन घेतलं त्यावेळी महाराष्ट्र सैनिकांनी राज्यभर आंदोलन पेटलं. पण जवळपास 65 तर 67 टोलनाके आंदोलनानंतर बंद झालेत.