खासदार राजन विचारेंच्या नावे देणगी उकळणारे भामटे गजाआड
ठाणे : ठाण्यातील शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या नावाने व्यापाऱ्यांना फोन करुन देणगी उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा भामट्यांना कासारवडवली पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. राजेश मिश्रा आणि सिद्धेश सुधाकर सामंत अशी अटक केलेल्या भामट्यांची नावे आहेत. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाईनगर येथे राहणाऱ्या निखील रावराई या व्यापाऱ्याचे घोडबंदर रोड, […]
ठाणे : ठाण्यातील शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या नावाने व्यापाऱ्यांना फोन करुन देणगी उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा भामट्यांना कासारवडवली पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. राजेश मिश्रा आणि सिद्धेश सुधाकर सामंत अशी अटक केलेल्या भामट्यांची नावे आहेत. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाईनगर येथे राहणाऱ्या निखील रावराई या व्यापाऱ्याचे घोडबंदर रोड, कावेसर येथे मिठाईचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी दुकानात असताना त्यांच्या मोबाईलवर आलेल्या फोनवर बोलणाऱ्या आरोपीने आपण खासदार राजन विचारे बोलतो आहे. आज बालदिन असल्याने अपंग मुलांना व्हीलचेअर वाटप करायचे आहे. त्यासाठी वडिलांचा नंबर द्या, अशी विचारणा केल्याने निखील याने आरोपीला वडिलांचा फोन नंबर दिला. त्या फोनवर आरोपीने संपर्क साधून 25 हजार रुपये देणगी देण्याची मागणी केली.
निखील याने घडलेली हकीकत वाघबीळच्या शिवसेना नगरसेवकाचा भाऊ रॉनी मणेरा यांना कळवली. त्यानंतर मणेरा यांनी सदर आरोपीशी संपर्क साधून पडताळणी केली. त्याचबरोबर 2 हजाराची पावती फाडण्याची विनंती केल्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीबाबत संशय बळावला. त्यांनी खासदार विचारे यांचे कार्यालय गाठले. तेव्हा खासदार विचारे यांनी बालदिनानिमित्त असा कुठलाही कार्यक्रम आयोजित केला नसल्याची खात्री झाल्याने तडक कासारवडवली पोलीस ठाणे गाठून भामट्यावर गुन्हा दाखल केला.
त्यानुसार, पोलिसांनी फोन ट्रेप करून दोघाही भामट्यांना अटक केली. तर ठाणे पोलिसांनी केलेल्या तपासात या आरोपींनी याआधी खासदार सुभाष देसाई आणि गोपाळ शेट्टी यांच्या नावाने देखील कॉल करुन व्यापाऱ्यांकडून पैसे उकळल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आता ठाणे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.