Rajya Sabha Election : आज मविआचं शक्तीप्रदर्शन, तीनही पक्षाच्या आमदारांना पवार-ठाकरे-खरगे मार्गदर्शन करणार, ट्रायडंटकडे महाराष्ट्राचे डोळे
विशेष म्हणजे ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी-काँग्रेसला त्यांचा एकही आमदार फुटणार नाही आणि त्याचा दगा शिवसेनेला बसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढींच्या उमेदवारीवरुनही मोठं वादळ उठलेलं आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीला आता काही दिवसच शिल्लक असताना मविआनं (MVA) मात्र एकही मत फुटणार नाही यासाठी कंबर कसलीय. मविआच्या सर्व आमदारांची एक बैठक आज सायंकाळी पार पडणार आहे. ह्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Udhav Thackeray) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसचे महाराष्ट्र निरिक्षक मल्लिकार्जून खरगे हे मार्गदर्शन करणार आहेत. सरकार स्थापनेच्या वेळीही अशीच एक बैठक त्यावेळेस पार पडली होती आणि त्यातूनच मविआकडे सरकार स्थापन करुन टिकवण्या इतपत संख्याबळ असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर आज पुन्हा तशीच बैठक पार पडतेय. त्यामुळे मविआच्या आजच्या बैठकीकडे शक्तीप्रदर्शन म्हणूनही पाहिलं जातंय. फक्त विरोधी भाजपचाच (BJP) नाही तर कोणत्या पक्षाचा कोणता आमदार गैरहजर राहतो त्याकडेही आजच्या बैठकीत लक्ष असेल.
आमदार बॅग भरुन मुंबईत
राज्यसभेची निवडणूक भाजपा आणि मविआ यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यातही शिवसेनेसाठी अधिकच. कारण शिवसेनेचे दोन संजय निवडणूकीत आहेत आणि त्यातल्या एका संजयला घरी बसवण्यासाठी विरोधकांनी डाव टाकलाय. अपक्षांना आपल्या बाजूनं वळवण्याचे संपूर्ण प्रयत्न भाजपा आणि मविआ करतंय. पण हे करत असतानाच स्वत:च्याच तंबुतला एखाद दोन विरोधकांना मिसळू नये म्हणूनही मविआ प्रयत्नशिल आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेनं स्वत:च्या आमदारांना बॅगा भरुन मुंबईत हजर व्हायला सांगितलंय. त्यांना ऑलरेडी रिट्रिट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय. तिथं त्याचं सर्व सोय केली गेलीय. काँग्रेस-राष्ट्रवादीनेही रिसॉर्ट राजकारण सुरु केलेलं आहे. त्यांनीही त्यांच्या आमदारांना अशाच स्वरुपाच्या सुचना दिलेल्या आहे. आज सायंकाळपर्यंत सर्व आमदार मुंबईत दाखल होतील आणि त्याच आमदारांची हॉटेल ट्रायडंटमध्ये सायंकाळी बैठक पार पडेल.त्या बैठकीकडे भाजपचेही लक्ष आहे.
समज आणि दम
जेव्हापासून भाजपानं तिसरा उमेदवार धनंजय महाडिकांच्या रुपानं मैदानात उतरवलाय, तेव्हापासून शिवसेनेच्या गोटात काहीशी हलचल आहे. आधी संभाजी छत्रपती यांच्यावरुन रंगलेलं नाट्य. त्यांनी केलेले आरोप, आणि शेवटी भाजपानं कोल्हापूरच्याच पैलवानाला मैदानात उतरवणं. ह्या सर्व पार्श्वभूमीवर घोडेबाजाराची चर्चा चांगलीच रंगलीय. घोडेबाजारावर संजय राऊत रोज दम देत असले तरी तो दम स्वत:च्या आमदारांनाच असल्याचं स्पष्ट होतंय. कारण मुख्यमंत्र्यांचं, गृहमंत्रलायाचं ह्या घडामोडींवर बारिक लक्ष असल्याचं ते पुन्हा पुन्हा सांगतायत.
जागा सहा, उमेदवार सात
ही निवडणूक इंट्रेस्टिंग झालीय ते जागा सहा आणि उमेदवार सात यामुळे. त्यातही दोन्ही बाजूंनी निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी प्रस्तावही पाठवले गेले पण मविआच्या प्रस्तावावर, भाजपानं प्रस्ताव दिला. शेवटी निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे महाडिक की शिवसेनेचे संजय पराभूत होणार याचा निकाल लागेल. विशेष म्हणजे ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी-काँग्रेसला त्यांचा एकही आमदार फुटणार नाही आणि त्याचा दगा शिवसेनेला बसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढींच्या उमेदवारीवरुनही मोठं वादळ उठलेलं आहे. पण काँग्रेसचं राजकारण माहित असणाऱ्यांना त्याचा फारसा धक्का बसलेला नाही.