राम शिंदे यांचे रोहित पवार यांना धक्क्यावर धक्के, आधी राष्ट्रवादीच्या 200 कार्यकर्त्यांना भाजपात घेतलं, नंतर काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष भेटीला, आता गंभीर आरोप
भाजप नेते राम शिंदे यांनी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई : कर्जत-जामखेडमधील राजकीय वातावरण चांगलंच तापताना दिसत आहे. भाजप नेते राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्यापासून ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून ते चांगलेच कामाला लागले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल 200 कार्यकर्त्यांना फोडत भाजपात सामील करुन घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण घुले यांची भेट घेतली होती. घुले आणि राम शिंदे यांच्यात बंद दाराआड महत्त्वाची चर्चा झाली होती. त्यामुळे घुले भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या दोन्ही घटना कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना धक्का देणाऱ्या असताना आज आणखी एक बातमी समोर आलीय. राम शिंदे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केला.
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कर्जत-जामखेडच्या प्रश्नावरुन भेट घेतली. काम सांगितल्यानंतर त्यांनी लगेच वेळ उपलब्ध करुन दिली. कर्जत-जामखेडच्या शिष्टमंडळासह मी आताच त्यांची भेट घेतली. त्यांना दोन कामं सांगितली”, अशी माहिती राम शिंदे यांनी दिली.
“पाणी पुरवठा जामखेड आणि मलनिस्सारण जामखेड, तसेच तुकाई उपसा सिंचन योजना, या योजनेला मार्च 2019 मध्ये सुरुवात झाली होती. 30 टक्के काम पूर्ण देखील झालं होतं. पण विधानसभेच्या निवडणुकीपासून आजपर्यंत विद्यमान विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी ही योजना बंद ठेवण्याचं पाप केलं”, असा आरोप राम शिंदे यांनी केला.
“मी याबाबत मागणी करताच मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांत प्रश्न सोडण्याचे आश्वासन दिलं. मुख्यमंत्र्यांनी 180 कोटींच्या पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण योजनेवर तात्काळ सही केली. या योजनेच्या भूमीपूजनलाही मुख्यमंत्री येणार आहेत. हे मुख्यमंत्री तात्काळ काम करत आहेत. ते जनतेची कामं करत आहेत”, असं राम शिंदे म्हणाले.