मुंबई: देवेंद्रजी तुम्ही बाबरी आंदोलनात गेला असताना तर बाबरी पाडायची गरज पडली नसती. तुम्ही एक पाय जरी टाकला असता तरी बाबरी खाली आली असती. लोकांना श्रमही करावे लागले नसते, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या बाबरी आंदोलनातील सहभागाची खिल्ली उडवली. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बाबरी पडली तेव्हा मी तिथे होतो. त्या ठिकाणी एकही शिवसैनिक नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लोकांना खोटं सांगू नये. दिशाभूल करू नये, असं रावसाहेब दानवे म्हणाले. यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही मुख्यमंत्र्यांवर टीका केली. आम्ही कुणाशी युती केली यावरून ते आमच्यावर टीका करत आहेत. पण ज्यांनी मुस्लिम लीगशी युती केली, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.
रावसाहेब दानवे मीडियाशी संवाद साधत होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची सर्व जनतेला उत्सुकता होती. राज्यातील जनेला दिलासा न देता. केवळ आणि केवळ भाजपवर त्यांनी टीका केली. आता त्यांच्यावर आम्ही हिंदुत्व सोडले असे म्हणायची पाळी आली आहे. त्यांनी हिंदुत्वाच्या गप्पा मारू नये, अशी टीका दानवे यांनी केली. उद्धव ठाकरे हे मुख्ममंत्री पदावर आहेत. त्यांनी जूने उकरून काढायला नकोय. ते आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी ते लक्षात ठेवावे. मुंबईला कोणीही तोडू शकत नाही. जेव्हा असा प्रकार होईल तेव्हा पक्ष बाजूला सोडून एकत्र येऊ, असंही त्यांनी सांगितलं.
आमची कोणतीही ए आणि सी अशी टीम नाही. तुम्ही आता आम्हाला शिकवू नका. येणाऱ्या काळात आम्ही त्यांना दाखवून देऊ. निवडणूकाच्या काळात भाजप काय आहे हे दाखवून देऊ, असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसारखं बोललं पाहिजे. राज्याच्या विकासाविषयी बोललं पाहिजे. ओवैसी आणि दाऊद हे त्यांचे ठरलेले मुद्दे आहेत. मुंबईला तोडण्याचा कोणाचा ईरादा नाही. मुंबई अभेद्य आहे. कोण टीनपाट हे त्यांनी ठरवावं का? जर राज्य सरकार सुरक्षा देत नसेल तर केंद्राला द्यावी लागते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ज्यांनी मुस्लिम लिगशी हातमिळवणी केली त्यांनी आम्हांला शिकवू नये. असंगाशी संग करुन तुम्ही दगाफटका केला. तुम्ही हिंदुत्ववादी राहिले नाही, असं सांगतानाच कोणाचं वजन किती आहे ते त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी मोजा. कोणाकडे किती जिल्हा परिषदा आहेत, कोणाकडे किती ताकद आहे यावरुन देवेंद्र फडणवीसांचं वजन मोजा, असा टोलाही त्यांनी लगावला.