Ratan Tata death : भारताच्या उद्योग क्षेत्रातला बापमाणूस हरपला, रतन टाटा यांचं निधन, ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास
प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा 86 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी टाटा यांनी ट्विट करत आपल्या प्रकृतीची माहिती दिली होती.
भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. रतन टाटा यांना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर टाटा यांनी सोमवारी (7 ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वत: ट्विट करत आपल्या प्रकृतीची मीहिती दिली होती. “माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही”, असं रतन टाटा म्हणाले होते. टाटा यांना दाखल केल्याची बातमी समोर आल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याची माहिती समोर आली. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. त्यांचं नाव भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानाने घेतलं जातं. रतन टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रात नाव कमवलं नाही तर त्यांनी माणसं जपली. कोरोना काळात देशावर मोठं संकट कोसळलं होतं. त्यावेळी रतन टाटा यांनी आपल्या हॉटेल्स राज्य सरकारला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी मोफत दिलं होतं. त्यांच्या या मदतीमुळे राज्यातील कोट्यवधी नागरिकांना मोठी मदत झाली होती. रतन टाटा यांच्याकडे एक खरे देशभक्त म्हणून पाहिलं जायचं. त्यांच्याकडून प्रचंड सामाजिक कार्यदेखील झालं. याशिवाय त्यांनी टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावरही पोहोचवलं. त्यामुळे रतन टाटा यांचं नाव उद्योग क्षेत्रासोबतच सर्वसामान्यांमध्येदेखील आदराने घेतलं जातं. अशा या दिग्गज उद्योगपतीचं निधन झाल्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रतन टाटा यांचे वडील जेआरडी टाटा यांनी 1991 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्षपद सोडले आणि त्यांचा उत्तराधिकारी म्हणून रतन टाटा यांना नियुक्त केलं होतं. रतन टाटा यांना 1991 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर उपकंपन्यांच्या प्रमुखांकडून तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागला होता. त्या सर्व गोष्टींचा प्रतिकार करत टाटा यांनी सर्वांचे हित जपत काम केलं. सर्वांची मने जिंकली. रतन टाटा यांनी 2012 मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
रतन टाटा एक माणूस म्हणून श्रेष्ठ व्यक्तीमत्व होते. त्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विचार केला. ते आपल्या कंपन्यांमधील कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या थेट संपर्कात जाण्याचा प्रयत्न करायचे. त्यांनी अनेकदा कर्मचाऱ्यांशी तसा संवादही साधला. ते कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रचंड काम करायचे. त्यांच्या प्रेमामुळे कर्मचारीदेखील टाटा यांच्यावर तितकाच प्रेम करायचा. टाटा यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्य आणि उद्योग क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.
रतन टाटा यांना 2000 मघ्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या सर्वोष्ठ मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर रतन टाटा यांना केंद्र सरकारकडून 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. टाटा यांना 2014 मध्ये ऑनररी नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने गौरविण्यात आलं होतं. त्यांना 2021 मध्ये आसाम वैभव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. रतन टाटा यांना 2023 मध्ये ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्कराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. अशा अनेक पुरस्कारांनी रतन टाटा यांना देशात आणि विदेशात सन्मानित करण्यात आलं होतं.