बिल्डरांनी वाट लावली, लाज वाटायला हवी, झोपडपट्ट्यांमधील कोरोनावरुन रतन टाटा आक्रमक
मुंबईत झोपडपट्ट्या उभारणाऱ्या बिल्डरांना लाज वाटायला हवी, असा घणाघात उद्योगपती आणि टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनी केला (Ratan Tata slams Developers and architects).
मुंबई : राज्यात मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Ratan Tata slams Developers and architects). मुंबईत कोरोनाचं संसर्ग वाढण्यामागे झोपडपट्ट्यादेखील महत्त्वाचं कारण ठरल्या आहेत. मुंबईत 2.5 चौरस किमीच्या क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये 10 लाख लोक राहतात. त्यामुळे मुंबईत कोरोनाचं संक्रमण वेगानं वाढलं आणि संपूर्ण शहराचं आरोग्य धोक्यात आलं. खरंतर या झोपडपट्ट्या उभारणाऱ्या बिल्डरांना लाज वाटायला हवी, असा घणाघात उद्योगपती आणि टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनी केला. ते एका ऑनलाईन सेमिनारमध्ये बोलत होते (Ratan Tata slams Developers and architects).
“मुंबईतील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणाऱ्या बिल्डरांनी झोपडपट्ट्या पाडून तिथे उंचच्या उंच इमारती उभारल्या आणि भरपूर पैसा कमवला. मात्र, या इमरातींच्या घरांमध्ये हवादेखील जाण्याची सोय नाही, इतक्या दाटीवाटीचं बांधकाम केलं गेलं आहे. दुसरीकडे एका भागातील झोपडपट्ट्या पाडल्या तर दुसऱ्या भागात त्या झोपडपट्ट्या उभारल्या जातात. त्यामुळे आता संपूर्ण शहरांचं आरोग्य धोक्यात आलं आहे”, असं रतन टाटा म्हणाले.
“एक आजार कशाप्रकारे आख्या जगावर राज्य करु शकतं, हे आपण गेल्या काही महिन्यांपासून बघतोय. हा आजार आपले ध्येय आणि काम करण्याची पद्धत बदलत आहे. आता वेळ आली आहे, चांगल्या गुणवत्तापूर्वक घरांचा विचार करायला हवा”, असंदेखील रतन टाटा यावेळी म्हणाले.
“मला आर्किटेक्ट बनायची प्रचंड इच्छा होती. मी दोन वर्ष अमेरिकेत इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतरही मला आर्किटेक्ट होता आलं नाही, या गोष्टीची मला अतिशय खंत वाटते. मला आर्किटेक्ट हे क्षेत्र खूप प्रेरणा देतं. कारण या क्षेत्राचा संबंध थेट लोकांच्या भावनांशी जोडला गेलेला आहे. मात्र, मी इंजिनिअर बनावं, अशी वडिलांची इच्छा होती. त्यामुळे मी दोन वर्ष इंजिनिअरिंग केलं”, असं रतन टाटा यांनी यावेळी सांगितलं.
संबंधित बातम्या :
मुंबई-पुण्यात दिलेल्या अंशत: सवलतीही रद्द, घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्याने निर्णय
परराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा, मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी