‘…तर घरात घुसून मारण्याची हिंमत’, रवी राणा-बच्चू कडू वाद पुन्हा पेटला
आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद मिटल्याचं चित्र असताना हा वाद पुन्हा चिघळताना दिसतोय.
मुंबई : आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद मिटल्याचं चित्र असताना हा वाद पुन्हा चिघळताना दिसतोय. आमदार बच्चू कडू यांनी काल अमरावतीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना रवी राणा यांना इशारा दिला होता. त्यानंतर आज रवी राणा यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत बच्चू कडू यांना ‘पुन्हा आमदार कसं निवडून येणार ते पाहतो’, अशा शब्दांत इशारा दिला. त्यामुळे राणा आणि कडू यांच्यातील वाद पुन्हा जास्त पेटण्याची शक्यता आहे.
रवी राणा नेमकं काय म्हणाले?
“मी स्वत: पुढे येऊन वाद मिटवलेला आहे. पण एक लक्षात ठेवा, कुणी जर मला दम देत असेल. तर रवी राणाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दम खालला नाही. बच्चू कडू तर काहीच नाही. ते दम देऊन बोलत असतील तर त्यांना जशास तसं उत्तर मी देईन. मग ते उत्तर कोणत्याही पातळीवर असूदे. उत्तर देईन”, असं प्रत्युत्तर रवी राणांनी दिलं.
“ते ज्या स्तरावर म्हणतील त्या स्तरावर उत्तर द्यायला तयार आहे. पण प्रेमाची भाषा बोलले तर रवी राणा दहा वेळा झुकायला तयार आहे. पण कुणी दम देऊन बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची देखील हिंमत आहे”, असा घणाघात रवी राणा यांनी केला.
“मंत्री बनणं किंवा न बनणं हा माझा अधिकार नाही. तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा अधिकार आहे. माझे नेते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आहेत. त्या दोन्ही नेत्यांचा आदर-सन्मान करुन दोन पावलं मी मागे आलो आहे आणि दिलगीरी व्यक्त केली आहे. कुणाचंही मन दुखू नये म्हणून तो विषय मी संपवला आहे”, असं रवी राणा म्हणाले.
“पण बच्चू कडू हे वारंवार दम देत असतील की मी रवी राणाला माफ करणार नाही. अरे माफ काय, तुला कुणी सांगितलं माफ करायला. तुझ्यामध्ये एवढी हिंमत असेल तर तू कसा निवडून येतो ते पाहा. वेळ सांगेल की बच्चू कडू पुन्हा आमदार बनेल की नाही बनणार”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
“उद्धव ठाकरे ज्यापद्धतीने राहत होते, शेवटी त्यांना पुन्हा मातीत धूळ खावी लागली. शेवटी लोकं अशी आखडतात की जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान करत नाहीत”, असं रवी राणा म्हणाले.
“एखाद्या गोष्टीला संपवण्यासाठी एखादा आमदार मन मोठं करुन संपवत असेत तर त्याला दादागिरीची भाषा वापरत असेल तर बच्चू कडू हा विषय माझ्यासाठी एकदम छोटा आहे. त्यांना कुठल्या भाषेत कधी उत्तर द्यायचं ते मला कळतं. फक्त मी हा विषय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदरामुळे संपवला आहे. बच्चू कडू पुढे पुन्हा दादागिरीची भाषा वापरत असतील तर त्यांना जशास तसं मी उत्तर देईन”, असा इशारा रवी राणा यांनी दिला.