शिवसेनेकडून रविंद्र वायकर आणि यामिनी जाधव यांना तिकीट, निरुपम यांचा पत्ता कट
मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांच्या लढती आज स्पष्ट झाल्या आहेत. महायुती आणि महाविकासआघाडीचा मुंबईतील जागांचा सस्पेंस अखेर संपला आहे. आज मुंबईतील सर्व जागांवरील उमेदवारांची घोषणा झाली आहे.
Loksabha Election : महायुतीचा मुंबईतील जागांचा सस्पेंस अखेर संपला आहे. कारण आज मुंबईत शिंदे गटानं 2 उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेने यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांना तिकीट दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या संजय निरुपम यांना उमेदवारी मिळालेली नाही.
शिवसेनेचे उमेदवार जाहीर
मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेनं आज दोन 2 उमेदवार जाहीर केल्यानंतर आता उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर तर दक्षिण मुंबईतून यामिनी जाधवा विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत होणार आहे. काही दिवसांआधीच वायकर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंकडे आले आहेत. महिन्याभराच्या आतच त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे.
संजय निरुपम यांचा पत्ता कट
विशेष म्हणजे वायकरांच्या उमेदवारीला मनसेनं उघड विरोध केला होता. भ्रष्टाचाऱ्याचा प्रचार आम्ही करायचा का ? असा सवाल मनसेच्या शालिनी ठाकरेंनी केला होता. आता वायकरांना तिकीट दिल्यानं शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या संजय निरुपमांचाही पत्ता कट झाला आहे. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केला नसला तरी संजय निरुपम इच्छुक होते. मंत्री उदय सामंतांनीही त्यांची भेट घेतली होती.
दक्षिण मुंबईतून भाजपकडून राहुल नार्वेकर इच्छुक होते. त्यांनी प्रचारही सुरु केला होता. तसंच मंत्री मंगलप्रभात लोढांचंही नाव चर्चेत होतं. मात्र दक्षिण मुंबईची जागा स्वत:कडे ठेवण्यात शिंदेंना यश आलं आहे. आता मुंबईतल्या 6 पैकी 6 लढती निश्चित झाल्या आहेत.
- दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव उमेदवार आहेत.
- दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे अनिल देसाई विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे अशी थेट लढत आहे.
- उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांची लढत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकरांशी होईल.
- उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपचे अॅड. उज्ज्वल निकम यांचा सामना होईल.
- मुंबई उत्तर पूर्वमधून भाजपचे मिहीर कोटेचा विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय दिना पाटील यांच्यात सामना आहे.
- उत्तर मुंबईतून भाजपनं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसनं भुषण पाटील यांना उमेदवारी दिली आहे.