कोट्यधीश उद्योगपती बाप-बेटे नऊ वर्षानंतर एकत्र, मुलाने ट्विट करत म्हटले…
Raymond chairman Gautam Singhania and Vijaypat Singhania : विजयपत सिंघानिया यांनी 2015 मध्ये कंपनीची सूत्र मुलाकडे दिली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला. 2017 मध्ये विजयपत सिंघानिया यांनी मुलाने मला घराबाहेर काढल्याचा आरोप केला होता.
मुंबई | 21 मार्च 2024 : तब्बल नऊ वर्षानंतर देशातील प्रसिद्ध रेमंड ग्रुपसाठी चांगली बातमी आली आहे. कंपनीचे संस्थापक विजयपत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्यातील वादावर लवकरच पडदा पडणार आहे. तब्बल नऊ वर्षांनी बाप-बेटे एकत्र आले आहेत. यासंदर्भात गौतम सिंघानिया यांनी ट्विट करत दोघांचा एक फोटो एक्सवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘आज माझे वडील घरी आले. त्यांच्या आशीर्वाद मिळाल्यामुळे मी खूप आनंदात आहे.’ विजयपत सिंघानिया यांनी 2015 मध्ये कंपनीची सूत्र मुलाकडे दिली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला. 2017 मध्ये विजयपत सिंघानिया यांनी मुलाने मला घराबाहेर काढल्याचा आरोप केला होता.
नवाज मोदीशी नुकताच गौतम सिंघानियाचा घटस्फोट
गौतम सिंघानिया नुकतेच पत्नी नवाज मोदीशी वेगळे झाले. त्यानंतर विजयपत सिंघानिया यांची मुलाखत आली. त्यात त्यांनी मुलाकडे उद्योगाची सूत्र दिल्याबद्दल आपणास खूप पश्चताप होत असल्याचे म्हटले होते. त्यांनी म्हटले होती की, माझ्याकडे आता काहीच नाही. मी त्याला सर्व काही दिले. चुकून माझ्याकडे काही पैसे वाचले. त्यातून मी माझे जीवन जगत आहे. तो (गौतम) आपल्या पत्नीला बाहेर काढू शकतो, आपल्या वडिलांना बाहेर काढू शकतो. परंतु याचे कारण काय? हे मलाही माहीत नाही.
Happy to have my father at home today and seek his blessings. Wishing you good health Papa always. pic.twitter.com/c6QOVTNCwo
— Gautam Singhania (@SinghaniaGautam) March 20, 2024
विजयपत सिंघानिया यांचा पालकांना सल्ला
विजयपत सिंघानिया यांनी मुलाखतीत म्हटले होते की, आई-वडिलांनी मुलाला सर्व काही देण्यापूर्वी विचार केला पाहिजे. मुलांना काही देऊ नका, असे मी म्हणत नाही. मुलांना जे काही द्याल ते आपल्या मृत्यूनंतरच द्या. अन्यथा त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागते. तुमची सून तुमच्याकडे आली तर तुम्ही दोघांमधील भांडण सोडवाल का? या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, नक्कीच त्यासाठी मी त्याच्याकडे जाईल. परंतु तो माझे ऐकणार नाही, हे मला माहीत आहे.
देशातील प्रसिद्ध उद्योग घरातील हा वाद चांगला चर्चेत आला होता. परंतु आता गौतम सिंघानिया यांनी केलेल्या ट्विटमुळे हा वाद मिटण्याचा मार्गावर असण्याची शक्यता आहे.