Bhandup Sunrise Covid hospital fire | भांडूप आगीचा अहवाल दोन दिवसात येणार, दोषींवर कारवाई करू: महापौर किशोरी पेडणेकर
भांडूपच्या आगीचा दोन दिवसात अहवाल येणार असून नंतर दोषींवर कारवाई करु असे आश्वासन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले. (bhandup sunrise covid hospital fire kishori pednekar)
मुंबई : भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला( Bhandup Sunrise Covid hospital fire) गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले. या दुर्घटनेंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज ( शुक्रवारी) घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर भांडूपच्या आगीचा दोन दिवसांत अहवाल येणार असून नंतर दोषींवर कारवाई करु असे आश्वासन महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिले. (report of Bhandup Sunrise Covid hospital fire would be received in two days assured Mumbai mayor Kishori Pednekar)
उद्धव ठाकरे, किशोरी पेडणेकर यांची घटनास्थळाला भेट
भांडूपच्या ड्रीम्स मॉल्समध्ये गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीमध्ये सनराईज रुग्णालयातील दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या घटनेची गंभीरतेने दखल घेत किशोरी पेडणेकर यांच्यासोबत आज घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच दुर्घटनेची माहिती घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत सनराईज रुग्णालयाला लागलेल्या आगीबाबत चर्चा केली. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, आग ही मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागल्यानंतर ती कोव्हिड सेंटरपर्यंत जाऊन पसरली. त्यानंतर ही दुर्घटना घडली, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
दोन दिवसांत अहवाल येणार, दोषींवर कारवाई करु
तसेच, या ठिकाणी अग्नीसुरक्षेची पुरेशी काळजी घेण्यात आली होती का ? याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचेही महापौर पेडणेकर यांनी सांगितले. यापूर्वी मुंबईमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर सर्व ठिकाणचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश अग्निशमन दलासोबत घेतलेल्या बैठकीत दिले असल्याचेही महापौर म्हणाल्या. त्यासोबतच सर्व कोव्हिड सेंटरमधील फायर ऑडिट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही दिले असल्याचीही माहिती किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांना दिली. तसेच या आगीचा आगामी दोन दिवसांत संपूर्ण अहवाल येईल. त्यानंतर यामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करु, असे आश्वासानही महापौरांनी दिले.
दरम्यान, ही दुर्घटना घडल्यानंतर कोव्हिड सेंटरमधील कोरोना रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये तत्काळ हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एका मॉलमध्ये कोव्हिड रुग्णालय असणे ही गंभीर बाब असून याबाबत सर्वंकष चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. संबंधित सनराईज रुग्णालयाला 28 फेब्रुवारी 2021 रोजी बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने 31 मार्च 2021 पर्यंत रुग्णालय बंद करू, असे रुग्णालय व्यवस्थापनाने महापालिका प्रशासनाला सांगितले होते. त्यानंतर कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या वाढल्यानंतर हे रुग्णालय पुन्हा सुरू झाले होते.
इतर बातम्या :
Bhandup mall fire: भांडूपच्या आगीचा पीएमसी बँकेशी संबंध?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…