अंधेरी आणि बोरीवलीत लवकरच ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’, पश्चिम रेल्वेच्या मुंबई डीव्हीजनचा पहिलाच प्रयोग
रेल्वे उत्पन्न वाढविण्यासाठी नवनव्या संकल्पना राबवित आहे, मध्य रेल्वेने सीएसएमटीत नुकतेच ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ तयार केले. हे रेस्टॉरंट जुन्या रेल्वे कोचचा कल्पक वापर करून तयार केले आहे. असाच प्रयोग आता बोरीवली आणि अंधेरीत होत आहे.
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रवाशांच्या पोटपुजेसाठी आलिशान ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ ची सोय करण्यात आली होती. या योजनेत एका रिकाम्या रेल्वेच्या बोगीला रेस्टॉरंटचे स्वरूप दिले जात आहे. लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या प्रवाशांचा या रेस्टॉरंटला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच धर्तीवर आता पश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि बोरीवली स्थानकात ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ उभारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना न्याहरी किंवा जेवण करण्याची चांगली सोय होणार आहे.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या लांबपल्ल्यांच्या गाड्या सुटणाऱ्या पी.डीमेल्लो रोडवरील प्रवेशद्वारावर अलिकडेच ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ उभारण्यात आले आहे. अशाच धर्तीचे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ आता पश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि बोरीवली स्थानकात उभारण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी मिडडेला माहिती देताना सांगितले आहे. अंधेरी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला गेट क्रमांक दहा जवळ तर बोरीवलीतील रेस्टॉरंट पूर्वेला विरारच्या दिशेला बांधण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनचे हे पहिले ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ ठरणार असल्याची माहीतीही त्यांनी दिली आहे.
40 जणांना बसण्याची व्यवस्था
रेस्टॉरंट ऑन व्हील्स ही संकल्पना चाकावरचे हॉटेलप्रमाणे तयार करण्यात आली आहे. त्यात रेल्वेच्या रिकाम्या बोगीला मॉडीफाय करण्यात येते. त्याच्या आतील इंटेरियर रेल्वेच्या थीमवर आधारीत असते. 40 जणांना बसण्याची व्यवस्था यात असते. त्यामुळे खवय्यांसाठी आणि रेल्वेप्रेमींसाठीही हे ठिकाणी एक पर्वणी बनणार आहे. येथे रेल्वे प्रवाशांसह जनरल पब्लिकलाही कुटुंबियांसह विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.
खवय्यांचा वाढता प्रतिसाद
मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( लांबपल्ल्यांचा फलाट क्र.18 जवल ) येथे तसेच नागपूरला ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ ही संकल्पना राबविली आहे. सीएसएमटी येथील या रेस्टॉरंटला आठवड्याच्या दिवसात दररोज 250 जण तर विकेंण्डला 350 जण भेट देत असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सूतार यांनी दिली आहे. सीएसएमटी येथील ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ला आतापर्यंत अंदाजे 1 लाख 25 हजार खवय्यांनी तर नागपूर येथील रेस्टॉरंटला 1 लाख 50 हजार खवय्यांनी भेट दिल्याचे म्हटले जात आहे.
मुंबई बाहेरही ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’
मुंबईच्या जवळलील कुर्ला, दादर, कल्याण, नेरळ, माथेरान, इगतपुरी आणि लोणावळासह मुंबईच्या बाहेर आकुर्डी, चिंचवड, मिरज आणि बारामती रेल्वे स्थानकावरही ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ स्थापन करण्याची योजना असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.