‘…तरी आदित्य ठाकरे यांना फसवण्यासाठी हे दुसरं काहीतरी बाहेर काढतील’, रोहित पवार यांचा दावा
सीबीआयने दिशा सालियान मृत्यू प्रकरणी अहवाल सादर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या विषयी वेगळाच दावा केलाय.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाबाबत सीबीआयने अहवाल सादर केलाय. या अहवालात दिशाचा अपघाती मृत्यू झाल्याचं नमूद केलंय. पण तिच्या मृत्यूचा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी संबंध जोडला होता. अखेर सीबीआयने दिशा सालियान मृत्यू प्रकरणी अहवाल सादर केल्याने या वादावर पडदा पडलाय. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या विषयी वेगळाच दावा केलाय.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा अहवाल आला असला तरी आदित्य ठाकरे यांना फसवण्यासाठी भाजप काहीतरी दुसरंच बाहेर काढतील, असा दावा रोहित पवार यांनी केला.
“आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियान प्रकरणात राजकारणासाठी आरोप करण्यात आले. मुंबईत निवडणूक होणार होती म्हणून आदित्य ठाकरेंवर आरोप झाले. आदित्य यांना फसवण्यासाठी हे दुसरं काहीतरी बाहेर काढतील”, असा दावा रोहित पवारांनी केला.
“आदित्य ठाकरेंवर जे आरोप झाले ते फक्त राजकारणासाठी झाले. त्यावेळेस मुंबईत निवडणूक होणार होती. पण निवडणूक झाली नाही. त्यावेळी झालेले आरोप हे फक्त मुंबईच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होते”, असं रोहित पवार म्हणाले.
“निवडणुकीच्या वेळेस आरोप केले जातात, नंतर सगळे विसरुन जातात. पण ते आरोप केल्याने ज्या व्यक्तीवर आरोप होतात त्या व्यक्तीचं नाव काही प्रमाणात खराब होतं. दिशा सालियान प्रकरणाचा निकाल आला असला तरी ते काहीतरी दुसरंच बाहेर काढतील”, असंदेखील रोहित पवार म्हणाले.