Rohit Pawar | रोहित पवार यांच्या पाठीशी पक्षाची ‘पॉवर’ ! ईडी कार्यालयात आज होणार चौकशी
Rohit Pawar | आज मुंबईत हायहोल्टेज ड्रामा रंगण्याची चिन्हं आहेत. रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे. तर ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे असतील. तर ईडीच्या कार्यालयाजवळच असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात शरद पवार पण उपस्थित असतील.
नवी दिल्ली | 24 January 2024 : मुंबईत आज शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, अंमलबजावणी संचालनालयात(ED) हजर होतील. बारामती अॅग्रोप्रकरणात आज ही चौकशी होत आहे. दरम्यान रोहित पवार एकटे नसल्याचे दाखवून देण्यात येणार आहे. खासदार सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत असतील. तर ईडीच्या कार्यालयाशेजारील राष्ट्रवादीच्या कार्यालयात शरद पवार उपस्थित असतील. ईडीला सहकार्य करण्याची भूमिका रोहित पवार यांनी अगोदरच जाहीर केली आहे. पण त्यांनी हे सूडाचे राजकारण असल्याचा गंभीर आरोप पण केला आहे. त्यामुळे आज मुंबईत हायहोल्टेज ड्रामा रंगण्याची चिन्हं आहेत.
सर्व जण पाठिशी
सध्याचे सूडाचे राजकारण सुरु असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. माझ्यावर ईडीने चुकीची कारवाई केली तर न घाबरण्याचे आणि न झुकण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आपला स्वाभिमानी बाणा आणि महाराष्ट्र धर्म टिकवायचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. हे घाणेरडे राजकारण करत आहेत, ते कोवळ्या वयातील मुलांसाठी समजण्याच्या पलिकडे असल्याची टीका त्यांनी केली. या कठीण प्रसंगात सर्वच जण खंबीरपणे पाठिशी असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
काय आहे प्रकरण
कन्नड सहकारी कारखाना अवसायनात निघाला. शिखर बँकेने त्याची लिलाव प्रक्रिया सुरु केली. हा कारखाना बारामती अॅग्रोने अवघ्या 50 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. तर लिलाव प्रक्रियेतील सहभागी कंपन्यांचे एकमेकांशी झालेले व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. बारामती अॅग्रोशिवाय या प्रक्रियेत हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या लिलावात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये हायटेक कंपनीने लिलावासाठी प्राथमिक पाच कोटी रुपये जमा केले ते, बारामती एग्रोने दिल्याचा आरोप आहे.
सुप्रिया सुळे असतील सोबत
दरम्यान रोहित पवार ईडी कार्यालयात जाताना त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे असतील. रोहित पवारांच्या सकाळी नऊच्या सुमारास हॉटेल ट्रायडेंट मधून पार्टी कार्यालयात जाणार आहेत. कार्यकर्ते व शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ईडी कार्यालयात जाणार असल्याची माहिती अमरावती जिल्हा अध्यक्ष शिवराज वाकोडे यांनी दिली आहे.