टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा आणि अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजल दिल्ली दौऱ्यावर होते. शिंदेंनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सहकुटुंब भेट घेतली. मात्र शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना, इकडे अमोल मिटकरींच्या ट्विटनं उलटसुलट चर्चा सुरु झालीय. कारण मिटकरींनी, अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असं म्हटलंय.
मुंबई | 22 जुलै 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले आहेत. विशेष म्हणजे यावेळी शिंदे सहकुटुंब मोदींना भेटलेत. एकीकडे मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत पंतप्रधांनाची भेट घेत होते. तर इकडे महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींच्या ट्विटनं उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. अजित पवार लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, असं ट्विट मिटकरींनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासह पंतप्रधान मोदींना भेटले. शिंदेंसोबत त्यांचे वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातूही होता. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीला, मुख्यमंत्री शिंदेंनी सदिच्छा भेट म्हटलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 3 दिवसातली मोदींसोबतची ही दुसरी भेट आहे. 18 जुलैला मुख्यमंत्री NDAच्या बैठकीसाठी दिल्लीत आले होते आणि अवघ्या 3 दिवसांतच पुन्हा शिंदेंनी मोदींची भेट घेतली. त्यामुळे 3 दिवसांतच शिंदे मोदींना का भेटले? यावरुन राजकीय वर्तुळातही चर्चा सुरु झालीय.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन, एकनाथ शिंदेंना 1 वर्ष, 1 महिना होतोय. या काळात 13वेळा शिंदे दिल्लीत आलेत. त्यावरुनच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख अलिबाबा करत, बोचरी टीका केलीय.
अमोल मिटकरी यांचं नेमकं ट्विट काय?
पंतप्रधानांना भेटून कुटुंबीयही समाधानी झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी शिंदेंनी सांगितलंय. तर अमोल मिटकरींच्या ट्विटनंतर चर्चेला उधाण आलंय. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मिटकरींनी अजित पवारांचा महाराष्ट्राचे होणारे मुख्यमंत्री असा उल्लेख केलाय. “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व…”, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं.
अमोल मिटकरींच्या या ट्विटनंतर खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकनाथ शिंदे गटाला डिवचलं. अजित पवार मुख्यमंत्री होणार असा पुनवृच्चार राऊतांनी केला. अमोल मिटकरींच्या ट्विटला गंभीरतेनं घेण्याची गरज नाही, असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये येऊन अजित पवार गटाला महिन्याभरही झालेला नाही आणि त्याच वेळी मिटकरींच्या या ट्विटनं भुवया उंचावल्यात. पण सध्या एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री असून पुढच्या निवडणुकीपर्यंत शिंदेच मुख्यमंत्री राहतील, असं भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी म्हटलंय.
अजित पवार जेव्हा राष्ट्रवादीतला मोठा गट घेऊन, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आले. त्यावेळीही शिंदे राजीनामा देतील आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे दावे प्रतिदावे सुरु झाले होते. त्या दाव्यांना मुख्यमंत्री शिंदेंना अफवा म्हटलं होतं. महाराष्ट्रातल्या साडे 3 वर्षांच्या राजकारणात प्रचंड घडामोडी घड़ल्या आहेत. साडे 3 वर्षांत महाराष्ट्राला फडणवीस, उद्धव ठाकरे आणि शिंदेंच्या रुपात 3 मुख्यमंत्री मिळाले. अजून विधानसभेच्या निवडणुकीला सव्वा वर्ष बाकी आहे.