‘मविआच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार, हा माझ्या पतीचा विजय’, ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया
नोटाला झालेलं मतदान हे भाजपलाच मिळालेली मतं आहेत. त्यांच्या मनात सहानुभूतीची भावना असती तर त्यांनी आधीच उमेदवार जाहीर केला नसता, अशी भूमिका ऋतुजा लटके यांनी मांडली.
मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झालाय. या निवडणुकीत ऋतुजा लटके यांचा विजय झालाय. ऋतुजा यांनी विजयानंतर अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच हा विजय म्हणजे आपल्या पतीने केलेल्या कामांची पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांनी दिली. “हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी त्यांची पूर्ण राजकीय कारकीर्दीत जी जनसेवा केली त्याचीच पोचपावती म्हणजे हा विजय आहे. मतदारांनी त्याचीच परतफेड केली आहे”, असं ऋतुजा लटके म्हणाल्या.
“भाजपने उमेदवार मागे घेतला असला तरी त्यांनी नोटाला पर्याय निवडण्याचं आवाहन केलं होतं. याबाबतचा एक व्हिडीओ देखील समोर आला होता. नागरिकांनी नोटाला का जास्त मतदान केलं? याबाबतचा प्रश्न तुम्ही मतदारांना विचारला पाहिजे की त्यांनी नोटाचं बटण का दाबलं”, असं ऋतुजा लटके म्हणाल्या.
“माझं पहिलं काम हेच आहे की, रमेश लटके यांची जी अर्धवट कामं राहिली आहेत, त्यांनी ज्यांना कामाचं आश्वासन दिलंय ते पूर्ण करणार. माझी पहिली प्राथमिकता तीच असेल. त्यांचा अंधेरीचा विकास हा ध्यास होता. मीदेखील तितक्याच प्रयत्नाने विकासाचा प्रयत्न करेन”, असं ऋतुजा यांनी सांगितलं.
“मी जनतेचा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब यांचे आभार मानते. मी महाविकास आघाडीची उमेदवार आहे. त्यामुळे मी मातोश्रीवर जाणारच आहे. पण मविआच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आभार मानते”, असं ऋतुजा म्हणाल्या.
“ही पोटनिवडणूक आहे. माझ्या पतींचं निधन झालंय. माझं एक दु:ख आहे की मला माझ्या पतीच्या जागेवर निवडणूक लढावी लागली”, असं ऋतुजा म्हणाल्या.
“नोटाला झालेलं मतदान हे भाजपलाच मिळालेली मतं आहेत. त्यांच्या मनात सहानुभूतीची भावना असती तर त्यांनी आधीच उमेदवार जाहीर केला नसता”, असा टोला ऋतुजा यांनी लगावला.