अबू आजमी यांनी चव सोडली, औरंगजेबाविषयी काय वक्तव्य केलं पाहा
कोल्हापुरात आज वातावरण बिघडलं. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांपासून लोकप्रतिनिधी, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांकडून शांततेचं आवाहन केलं जात आहे. असं असताना आता अबू आजमी यांनी या प्रकरणात उडी घेत भूमिका मांडली आहे.
मुंबई : कोल्हापुरात औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं स्टेटस ठेवलं म्हणून आज हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं. या आंदोलनावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पोलिसांवर दगडफेक झाली. त्यामुळे पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. तसेच पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. संबंधित घटनेमुळे संपूर्ण राज्य सुन्न झालं आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंग्याचं उदात्तीकरण करणाऱ्यांना सोडणार नाही. पण कायदा कुणीही हातात घेऊ नये, असं म्हटलं आहे. असं असताना आता समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
“मी औरंगजेबाच्या सोबत आहे. त्यांचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल ते एक धर्मनिरपेक्ष राजा होते. त्यांनी अफगाणिस्तानातून येवून भारतवर्ष बनवलं. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे हिंदू आणि मुस्लिम राज्यकर्त्यांनी सत्ता चालवण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले, पण आज राजकीय फायद्यासाठी त्यांना धार्मिक रंग देऊन द्वेष पसरवला जात आहे, त्यात गोदी मीडियाचा मोठा हात आहे”, असं ट्विट अबू आजमी यांनी केलं आहे.
अबू आजमी यांच्या ट्विटला शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ही बघा औरंग्याची औलाद! पत्रकाराच्या प्रश्नांना मुद्देसुद उत्तरे देता आली नाही की भाजपचे टॅग लावायचे हे यांचं राजकारण. हिंमतच कशी होते यांची शिवछत्रपतींच्या मुलुखात राहून औरंग्याचे उदात्तीकरण करण्याची?”, अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली आहे.
कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा मोलाचा सल्ला
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लोकप्रतिनिधींना मोलाचं आवाहन केलं आहे. त्यांनी या प्रकरणी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. “सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना माझं आवाहन आहे की, आपण सर्वांनी सुद्धा आपल्या सर्व अनुयायांना, आपल्या कार्यकर्त्यांना समाजात शांतता प्रस्थापित राहावी यासाठी प्रयत्न करण्याचं पूर्णपणे आवाहन करावं. आपणही त्यांना पाठबळ द्यावं, असं मी आवाहन करतो”, असं राहुल रेखावार म्हणाले.
“आपला देश लोकशाहीचा पुरसकर्ता आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान देशाबाहेर गेल्यावर सुद्धा आपल्या देशाला लोकशाहीची जननी आहे, असं म्हणतात. त्यामुळे या लोकशाहीवर आधारित असणाऱ्या देशाला, आपल्या संविधानाला कोणताही डाग लागू नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे”, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलं.