मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांना अटक केल्यानंतर त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) रस्त्यावर उतरली आहे. आज तिसऱ्या दिवशीही राष्ट्रवादीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं. चेंबूरमध्येही आज जोरदार आंदोलन करण्यात आले असून स्वत: नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक (sana malik) या आंदोलनात उतरल्या आहेत. नवाब मलिक यांच्यावरील कारवाई चुकीची आहे. सूडाबुद्धीतून ही कारवाई करण्यात आल्याचा दावा करतानाच दहशतवाद्यांशी आमचं कनेक्शन असतं तर एवढ्या वर्षापासून जनतेने मलिक साहेबांना वारंवार निवडून दिलं असतं का? जनता काय पागल आहे का? असा सवाल सना मलिक यांनी केला. मलिक हे गेल्या 30 वर्षापासून राजकारणात आणि 40 वर्षांपासून समाज कारणात आहेत. ते सेल्फमेड मॅन आहेत, असं त्या म्हणाल्या. यातून कुठे तरी मतांसाठी फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत आहे. भाजपचं हे राजकारण योग्य नाही, असंही सना मलिक यांनी म्हटलं आहे. चेंबूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी सना मलिक बोलत होत्या.
नवाब मलिक यांना अटक केलीये म्हणजे याचा अर्थ कुठेतरी केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर केला जात आहे. आणि कुणाचाही संबंध कुणाशीही अशा पद्धतीने जोडू नये. या देशात लोकशाही आहे. माझे वडील तपास संस्थांच्या विरोधात बोलत होते म्हणून त्यांच्यावर कारवाई केली अशी माझी भावना आहे, असं सना मलिक यांनी सांगितलं.
नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. त्याबाबत विचारले असता, त्यांनी राजीनामा द्यावा असं मला तरी वाटत नाही. त्यांनी राजीनामा देण्याची गरज आहे असं वाटत नाही. मलिक यांचा राजीनामा घेऊ नये असा निर्णय महाविकास आघाडी म्हणून सर्व नेत्यांनी घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं.
तर, नवाब मलिक यांनी सार्वजनिक जीवनात 30 वर्षे घालवली आहेत. त्यांच्यावर झालेली कारवाई केवळ ते केंद्र सरकारविरोधात बोलत असल्यामुळे होत आहे. यासाठी नवाब मलिक यांचा आतंकवादाशी संबंध लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. ईडी, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणा ज्याप्रकारे काम करत आहेत, या सर्व कारवाया सुडाच्या भावनेतूनच होत असल्याचे महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलं आहे. महाविकास आघाडी सरकारने या भूमिकेचा निषेध व्यक्त केला आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नवाब मलिक यांची आज जेजे रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना अॅडमिट करण्यात आलं आहे. ईडीने आज सकाळी त्यांना जेजेमध्ये आणलं होतं. त्यावेळी मलिक यांच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नव्हता. मात्र, त्यांना कोणत्या कारण्यासाठी अॅडमिट करून घेतलं ते समजू शकलं नाही.
संबंधित बातम्या:
‘बांगलादेशातून मुली आणून वेश्याव्यवसाय केला, आमच्याकडे Video आहे’ आणखी एक सनसनाटी आरोप