मुंबई: मशिदीवरील भोंग्याविरोधात आंदोलन करत असताना पोलिसांकडून अटक होण्याच्या भीतीने मनसे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) आणि संतोष धुरी (santosh dhuri) यांनी आंदोलनातून पळ काढला. यावेळी झालेल्या गोंधळावेळी एक महिला पोलीस जमिनीवर पडल्याने जखमी झाली. या प्रकरणी धुरी आणि देशपांडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या दोघांच्या अटकेसाठी त्यांची शोधाशोध करत असतानाच या दोघांनीही सत्र न्यायालयात (court) जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. आज या याचिकेवर कोर्टात युक्तिवाद झाला. त्यावर गुरुवारी 19 मे रोजी निर्णय देणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे धुरी आणि देशपांडे यांना अटकपूर्व जामीन मिळणार की त्यांची रवानगी कोठडीत होणार हे गुरुवारीच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, संतोष धुरी आणि संदीप देशपांडे अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी या दोघांनीही सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. आज या याचिकेवर सुनावणी झाली. कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला असून या प्रकरणी गुरुवारी निर्णय देण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणावर कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भोंग्याविरोधातील आंदोलनातून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पळ काढला होता. या धावपळीत एक महिला पोलीस पडल्याने तिच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तेव्हापासून हे दोन्ही नेते गायब झाले आहेत.
दरम्यान, संदीप देशपांडे हे फरार झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या. काही कार्यकर्त्यांची धरपकड केली. मनसेचे कार्यकर्ते हे पाकिस्तानातून आलेले अतिरेकी आहेत की हैदराबादमधील रझ्झाकार आहेत, असा सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता. तसेच संदीप देशपांडे यांचाही या पत्रात उल्लेख केला होता. सत्ता येते आणि जाते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आला नाही. तुम्हीही नाही, असा सूचक इशाराही राज यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता.