मुख्यमंत्री जाणार म्हणून वर्षा ते विधिमंडळ रस्ते गुळगुळीत…ठाकरेंनी राज्यभर प्रवास करावा, मनसे नेते संदीप देशपांडेंचा टोला
पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरेंनाही आमचा सवाल आहे की, जरा इथे लक्ष द्या. विदेशात जाता तिथले दाखले देता, मग इथे का दुर्लक्ष…? तीन दिवसांत जर महापालिकेने याकडे लक्ष दिले नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
मुंबईः मुख्यमंत्री विधिमंडळ अधिवेशनात येणार का, याच चर्चेवरून कालचा दिवस गाजला. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी आपला चार्ज रश्मी ठाकरे यांच्याकडे द्यावा, असा अनाहूत सल्ला दिला. त्यावरून दिवसभर भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगला. आता अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्री येणार असल्यावरूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार टोलेबाजी केलीय. मुख्यंमंत्री विधिमंडळ अधिवेशनाला जाणार म्हणून वर्षा ते विधिमंडळ रस्ते गुळगुळीत केले. आता उद्धव ठाकरे यांनी राज्यभर प्रवास करावा. त्यामुळे तिथलेही रस्ते गुळगुळीत होतील, असा टोला त्यांनी हाणला आहे.
राज्यभर प्रवास करा…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळ अधिवेशनाला जाणार म्हणून सरबराई सुरू आहे. त्यासाठी वर्षा ते विधिमंडळ इथले रस्ते गुळगुळीत करण्यात आले आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असाच प्रवास राज्यभर करावा. त्यामुळे तिथलेही रस्ते गुळगुळीत होतील. लोकांच्या अडचणी मिटतील, असा खोचक सल्ला देत त्यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे. यामुळे आज दिवसभर या विषायावरून बरंच रामायण घडेल यात शंका नाही.
जर इकडे पहा…
संदीप देशपांडे इतक्यावरच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले की, राज्यात बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची अवस्था ही अतिशय दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. कोकण, विदर्भ, मुंबईत तर अनेक ठिकाणी रस्ते खराब झालेले दिसतील. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मागणी आहे की, मुख्यमंत्र्यांनी या रस्त्यांवरूनही प्रवास करावा. त्यांच्या अशा दौऱ्यांमुळे या भागातील रस्त्यांचे भाग्य उजळेल आणि येथील रस्त्यांचीही डागडुजी करण्यात येईल.
आदित्य ठाकरेंवरही टीका
संदीप देशपांडे यांनी यावेळी महापालिकेलाही लक्ष्य करायची संधी सोडली नाही. ते म्हणाले, घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्राकडे मुंबई महापालिकेचे लक्ष नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरेंनाही आमचा सवाल आहे की, जरा इथे लक्ष द्या. विदेशात जाता तिथले दाखले देता, मग इथे का दुर्लक्ष…? तीन दिवसांत जर महापालिकेने याकडे लक्ष दिले नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
इतर बातम्याः
Railway canceled | दुष्काळात तेरावा…ऐन एसटी संपात भुसावळ विभागात मध्य रेल्वेच्या 18 गाड्या रद्द
देशात ओमिक्रॉनचे वाढते आकडे, पंतप्रधान मोदींची आज हायलेव्हल बैठक, देश पुन्हा लॉकडाऊनकडे जातोय?