जैतापूर प्रकल्पासाठी नारायण राणे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना किती कोटींची ऑफर?; संजय राऊत यांनी आकडाच सांगितला
जैतापूर प्रकल्पासाठी नारायण राणे यांनी त्यावेळी उद्धव ठाकरे यांना अडीचशे कोटींची ऑफर दिली होती, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी, मुंबई : जैतापूर प्रकल्पासाठी नारायण राणे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना 250 कोटींची ऑफर आली होती, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा दावा केला आहे. नारायण राणे स्वत: ऑफर घेऊन आले होते. 250 कोटींची. तुम्ही अडीचशे कोटी घ्या, मी अडीचशे कोटी घेतो, असं राणे उद्धव ठाकरे यांना म्हणाले होते. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांना लाथ मारून हाकलून दिलं होतं, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
संजय राऊत यांच्या या आरोपाने खळबळ उडालेली असतानाच भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत राऊत यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संजय राऊतांना काय माहीत आहे? मी विधानसभेत हा प्रश्न लावून धरला. पाच कोटी अॅडव्हान्स घेतले आणि पाचशे कोटीची बोलणी झाली हा आरोप मी केलाय विधानसभेत केला. कोळश्यातून वीज निर्मिती करणारे एकूण 34 उद्योजक होते. त्यांचा भांडाफोड मीच केला होता.
पुडी सोडायला राऊतांना कामधंदा नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. जैतापूर प्रकल्प आणू नका असं सांगणारे 34 उद्योजक होते. हा प्रकल्प आणू नका आमची वीज खपणार नाही असं हे उद्योजक सांगत होते. तसा आरोप मी विधानसभेत केला होता. केवळ इथे आरोप करत नाही. प्रोसेडिंग काढून बघा, असं आव्हानच राणे यांनी दिलं आहे.
अडवून दाखवाच
दरम्यान, संजय राऊत यांनी बारसूच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बारसूचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. अजूनही तिथे अत्याचार सुरू आहेत. अजूनही पोलीस कारवाया सुरू आहेत. अजूनही शेतकरी आणि महिलांवर जबरदस्ती सुरू आहे. हे सर्व थांबलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांना कोकणात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा देण्यात आला. हा इशारा नाही, ही सुद्धा एक धमकीच आहे. पण आम्ही या धमक्यांना भीक घालत नाही. आम्ही आता देखील कोकणात जाणार आहोत. आम्हाला अडवूनच दाखवा, असं आव्हानच राऊत यांनी राणेंना दिलं आहे.
कुणाचे पाय लटपटत आहेत?
येत्या 6 तारखेला उद्धव ठाकरे महाडला जाणार आहेत. महाडला उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. महाड हे सुद्धा कोकणातच येतं. कोकणाच्या बाहेर आहे काय? महाडमध्ये अडवून दाखवा आम्हाला, असं सांगतानाच कोकणातील जनतेने तुम्हाला घरी बसवलेलं आहे. एकदा नाही दोनदा. त्यामुळे कोणाचे पाय लटपटत आहेत, हे सर्वांना माहीत आहे, असंही ते म्हणाले.