मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि ठाकरे गटाचे नेते यांच्यात जराही विस्तव जात नाही. दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर येथेच्छ टीका करत आहेत. शिंदे गटाकडून सर्वाधिक टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर केली जात आहे. राऊत वेडे झालेत. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका. राऊतांमुळे पक्ष फुटला. राऊत शरद पवार यांचे एजंट आहे. राऊतांमुळेच आमदार फुटले. राऊत यांनी सकाळची बडबड बंद करावी. कुत्र पिसाळलं म्हणून त्याला दगडं मारायची का? राऊत यांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावंच… आदी टीका आणि आव्हाने सातत्याने शिंदे गटाकडून राऊतांवर केली जात आहे. त्यात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट सर्वाधिक आघाडीवर आहे. संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर कॅमेऱ्यासमोर सर्वाधिक टीका केली. पण प्रत्यक्ष भेटल्यावर राऊत यांना नमस्कार केला. त्यामुळे राऊत आणि शिरसाट यांच्यात काय चाललंय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
संजय राऊत यांच्यासोबत वरळी सी लिंकवर भेट झाली. राजकारणात भांडण आहे. आमचं वैयक्तिक भांडण नाही. संजय राऊत आणि सुनील प्रभू गाडीने येत होते. मीही येत होतो. राऊतांनी मला नमस्कार केला. मीही त्यांना नमस्कार केला. आणि विशेष म्हणजे आम्ही हसून नमस्कार केला. आमचे राजकीय मतभेद असले तरी आमची वैयक्तिक दुश्मनी नाही. राऊत यांनी मला नमस्कार केला. मीही त्यांना नमस्कार केला हे मला चांगलं वाटलं, असं संजय शिरसाट म्हणाले.
राजकीय विरोध कायम असेल. त्यांची भूमिका वेगळी असेल. आमची भूमिका वेगळी असेल. वैयक्तिक दुश्मनी थोडीच आहे आमची. मी उद्धव साहेबांनाही मानतो. जे आमचे विरोधक आहेत… मग अजितदादाही असतील, त्यांनाही मी मानतो. पण भूमिका आमची वेगवेगळी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर आज सभागृहात बसले होते. त्यावरही त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त केली. देव करो त्यांची इच्छा पूर्ण होवो. अनेक वर्षापासून आमदार होण्याची त्यांची इच्छा आहे. पण उद्धव साहेबांनी त्यांना बनवलंनाही. उद्धव ठाकरे यांचा चाणक्य म्हणून ते ओळखले जायचे. आज ते साईड ट्रॅक झाल्यासारके वाटत आहेत. त्यामुळे ते अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आले आहेत. अर्थसंकल्पाशी त्यांचं देणंघेणं नाही. तरीही ते आले. राजकीय लोकांशी त्यांचं देणंघेणं आहे. निश्चितच ते त्यांचा मार्ग शोधत असतील, असं सूचक विधान त्यांनी केलं.
त्यांचा सर्वांशी जवळीक आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचं एकदम खास आहे. दरवर्षी गणपतीला देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी जातात. शिंदे साहेबांशीही त्यांचं खास आहे. शिंदेही दरवर्षी त्यांच्या घरी जातात. सर्व पक्षांशी नातं असलेला एकमेव कार्यकर्ता आहे. मिलिंद नार्वेकर. ते काहीही करू शकतात हा कॉन्फिडन्स सर्वांनाच आहे. त्यामुळे ते कधी काय उडी घेतील सांगता येत नाही. उद्धव ठाकरे यांच्या ते जवळ आहेत असं वाटत नाही. त्यांनाही वाटतंय आपण आपला मार्ग बदलला पाहिजे, असंही ते म्हणाले.
अर्थसंकल्पात काय मिळणार याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे. आम्हाला काय मिळणार याकडे लोकांचं लक्ष आहे. सर्वसामान्यांना योजना लागू कशा होतील याकडे आमचं लक्ष आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे योग्य अर्थसंकल्प मांडतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.