‘काँग्रेसकडे कुठली जिंकलेली जागा आहे का?’, संजय राऊतांचा खोचक सवाल
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरण्याआधी काही महत्त्वाच्या हालचाली घडत आहेत. जागावाटपावरुन मित्रपक्षांमध्येच शितयुद्ध सुरु झालेलं बघायला मिळत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून भूमिका जाहीर करण्यात आलीय. त्यावर संजय राऊतांनी स्पष्ट भूमिका मांडलीय.
दिनेश दुखंडे, Tv9 मराठी, 28 डिसेंबर 2023 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या गोटात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्या बाजूने जोरदार हालचाली घडत आहेत. महाविकास आघाडीचाही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. त्यासाठी पडद्यामागे हालचाली घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाने 23 जागांवर दावा केला आहे. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांनी दिल्लीत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत की, ठाकरे गट 23 जागांवर दावा करु शकत नाही. कारण त्यांचे अनेक खासदार पक्ष फोडून गेले आहेत, पक्ष फुटलेला आहे. शरद पवार गटाबाबतही त्यांची तीच भूमिका आहे. कारण त्यांचाही पक्ष फुटला आहे. काँग्रेस नेत्यांच्या या भूमिकेबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
‘काँग्रेसकडे कुठली जिंकलेली जागा आहे का?’
“पक्ष फुटला की नाही ते काँग्रेस ठरवू शकत नाही. आमदार निघून जातात, खासदार निघून जातात. पण त्या पक्षाला मानणारा मोठा मतदारांचा वर्ग असतो, तो जागेवरच राहणार. त्यामुळे शिवसेनाने 23 जागा याआधी सातत्याने लढल्या आहेत. त्यापैकी आमचे 18 लोकं निवडून आले. त्यापैकी काही पक्ष सोडून गेले. त्या 23 जागांवर शिवसेना लढणारच आहे”, अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली. “आमची (उद्धव ठाकरेंची) भूमिका अशी होती की, आधी जिंकलेल्या जागांवर चर्चा करु. काँग्रेसकडे कुठली जिंकलेली जागा आहे का? नाही. काँग्रेसला शुन्यातून सुरुवात करायची आहे. काँग्रेसला शुन्यातून सुरुवात करायची असेल तर आम्हाला काँग्रेसची चर्चा करावी लागेल. कारण आम्ही एकत्र आहोत”, असं संजय राऊत म्हणाले.
‘महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो’
“दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आम्ही 23 जागा लढणार. हे मी अत्यंत काळजीपूर्वक आणि विश्वासाने सांगतोय. महाराष्ट्रातील काही लोकं टीप्पणी करत असतील. पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण आम्ही दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधतो. जागांची देवाणघेवाण होऊ शकते. कोण कुठे इच्छूक आहे ते मला माहिती नाही. काँग्रेससोबत अधिकृतपणे चर्चा झालेली नाही. काँग्रेसकडून अधिकृत चर्चा झाली तर आम्ही प्रतिक्रिया देऊ”, असं संजय राऊत म्हणाले.
“आता ते म्हणतात, आमचा पक्ष फुटला नाही. तसा तो राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही फुटला नव्हता. त्यावर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत नाही. तर तुम्ही जमिनीवर किती आहात, यावरुन जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे. आम्ही वर्षानुवर्षे जिंकत आहोत. ते मतदारसंघ शिवसेनेचे बालेकिल्ला आहेत. त्यामुळे एखादा वरचा माणूस निघून गेला तरी मतदार आहे. आम्ही आमच्या 23 जागा लढवू. तसेच आम्ही दादरा नगर हवेलीची जागा लढवू”, असं संज राऊत म्हणाले.
‘त्या चर्चांना तथ्य नाही’
“जागावाटपाबाबत यादी दिल्याच्या चर्चांना तथ्य नाही. महाराष्ट्रात जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्यानंतर, शेवटी राष्ट्रीय पक्षांचे हे निर्णय दिल्लीत घेतले जातात, भाजपच्या बाबतीत देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री हे दिल्लीत जावूनच निर्णय घेतात ना, काँग्रेसचीही तीच भूमिका असते. त्यामुले आम्ही इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला गेलो तेव्हा आम्ही काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटलो. त्याआधी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना भेटलो”, असं संजय राऊतांनी सांगितलं.
‘महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत चर्चा दिल्लीत होईल’
“आमचं असं ठरलं की, महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत चर्चा करायची असेल तर ती दिल्लीत केलेली सोयीची ठरेल. कारण एकाच वेळी सर्व निर्णय घेता येतील. प्रत्येक वेळेला एकेक जागेसाठी दिल्लीत येणं, त्यामुळे विलंब होऊ शकतो. त्यामुळे याबाबतची चर्चा दिल्लीत होणार आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांनी ते मान्य केलं आहे. त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. जे काही होईल ते दिल्लीत होईल”, असंही राऊतांनी सांगितलं.
‘प्रकाश आंबेडकर आपल्याबरोबर हवेत, अशी आमची भूमिका’
“वंचित बहुजन आघाडीबाबत जशी शरद पवारांनी चर्चा केली तशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनीदेखील केलील की, प्रकाश आंबेडकर आपल्याबरोबर हवेत, त्यासंदर्भात आपण एकत्र बसून निकाल घेतला पाहिजे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर झाली आहे. पण त्यांनी महाविकास आघाडीत असावं ही आमची भूमिका आहे. सगळे निर्णय दिल्लीत होतील”, असं राहुल गांधी म्हणाले.