Sanjay Raut on Navneet Rana Case: लकडावालाकडून 80 लाख घेणाऱ्या राणा दाम्पत्याची चौकशी का नाही?; राऊतांचा ईडीला सवाल
Sanjay Raut on Navneet Rana Case: नवनीत राणा यांचे लकडावालाशी कसे संबंध होते, याचा एक पुरावा मी समोर आणला आहे.
मुंबई: नवाब मलिक असो की अनिल देशमुख या आमच्या मंत्र्यांना पाच लाख, 20 लाखासाठी आत टाकता. आमच्या मालमत्तांवर टाच आणता. मग डी गँगशी संबंधित लकडावालाने (lakdawala) मनी लॉन्ड्रिंग केली. तो तुमच्या कस्टडीत होता. तुम्ही त्याच्या मनी लॉन्ड्रिंग (money laundering) केसेसमधील सर्वांची चौकशी केली. मग राणा दाम्पत्यांची चौकशी का केली नाही? माझा हा ईडीला सवाल आहे, असं संजय राऊत (sanjay raut) म्हणाले. लकडावाला हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात होता. तेव्हा तुम्ही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राणा दाम्पत्यांची चौकशी का केली नाही? तुमच्यावर कुणाचा दबाव होता? कोणते हस्तक दबाव आणत होते, असा सवालही राऊत यांनी केली. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. हनुमान चालिसाच्या निमित्ताने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होता. त्यात मला अंडरवर्ल्ड कनेक्शन दिसतंय, असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
नवनीत राणा यांचे लकडावालाशी कसे संबंध होते, याचा एक पुरावा मी समोर आणला आहे. राणा दाम्पत्य अचानक राम आणि हनुमान भक्त झाले. त्यात ते इतके डुबले की मुंबईत येऊन धिंगाणा करू लागले. मुंबईतील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न झाला. हनुमान चालिसाच्या निमित्ताने वातावरण बिघडवण्याचं प्रयत्न सुरू आहे. त्यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे.1992-93च्या दंगलीत अंडरवर्ल्ड कनेक्शन होतं. पाकिस्तानचं कनेक्शन होतं. डी गँगचं कनेक्शन होतं. माफिया टोळ्या होत्या. मला आता तसंच दिसतंय. सरकारलाही तेच दिसतंय, गेल्या पंधरा दिवसात जे काही घडलंय त्यावरून पुन्हा एकदा त्याच प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचं काम सुरू असलेलं दिसतंय. भोंगे प्रकरण, हनुमान चालिसा प्रकरण यामागे डी गँग आणि त्यांचा पैसा काम करतोय असंच दिसतंय, असा दावा राऊत यांनी केला.
लकडावालाकडून 80 लाख रुपये कशासाठी घेतले
लकडवाला मुख्य फायनान्सर आहे. त्याचे आणि राणा दाम्पत्याचे आर्थिक हितसंबंध कसे आहे याचं लहानसं प्रकरण मी समोर आणलं. त्याची चौकशी का झाली नाही? जर लकडवालाने मनी लॉन्ड्रिंग केले आहे. त्याचा पैसा अनेक ठिकाणी फिरवला गेला. त्यातले एक लाभार्थी राणा दाम्पत्य आहेत. त्यांनी लकडावालाकडून 80 लाख रुपये घेतले. का घेतले? कशासाठी घेतले? आंतरराष्ट्रीय गुन्हेगार डि गँगशी संबंधित डॉनच्या पैशाचा वापर कुठे झाला? एवढेच पैसे आहेत की अजून आहेत? याचा तपास मुंबईच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने का केला नाही? कारण हा लकडावाला आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कस्टडीत होता. नंतर तो ईडीच्या कस्टडीत होता. मनी लॉन्ड्रिंगची ही फिट केस आहे. तरीही राणा दाम्पत्याची चौकशी का झाली नाही?, असा सवाल त्यांनी केला.
फक्त राणांना का सोडलं?
मग नवनीत राणा या सगळ्यातून कसे सुटू शकते? त्यांना वाचवणाऱ्या कोणत्या आंतरराष्ट्रीय शक्ती आहेत? त्यांच्या माध्यमातून अस्थिरता करण्याचा प्रकरण आहे. माझ्याकडे अनेक प्रकरण आली आहेत. कालच ही सर्व प्रकरणे मुख्यमंत्र्यांना दिली आहेत. ते योग्य ठिकाणी देतील. या प्रकरणाची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आधी चौकशी का केली नाही? त्यात कुणाचे हस्तक होते की त्यांनी राणांना चौकशीला बोलावले का नाही?माझा सवाल ईडीला आहे. 5 लाख, 20 लाखासाठी मंत्र्यांना तुरुंगात टाकता. मालमत्तेवर टाच आणता. लकडावाला तुमच्या कस्टडीत होता. सर्वांना चौकशीला बोलावलं फक्त राणांना का सोडलं?, असा सवालही त्यांनी केला.