निवृत्ती बाबर, Tv9 मराठी, मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आर्थर रोड कारागृहात आलेल्या अनुभवाविषयी लेख लिहिला आहे. त्यांनी ‘सामना’च्या दिवाळी अंकात कसाबच्या यार्डात हे सदर लिहलेले आहे. यामध्ये त्यांनी तुरुंगात आलेले अनुभव लिहले आहेत. त्यांच्या तुरुंगातील अनुभवांचा आगामी पुस्तकात देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. संजय राऊत यांनी या लेखात जेल प्रशासनावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता त्यांनी आपल्या लेखात आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. संजय राऊत आर्थर रोड कारागृहातील ज्या बॅरेकमध्ये कैद होते त्याच्या बाजूलाच लंडनच्या एका खास पाहुण्यासाठी बॅरेक बनवण्यात आलं होतं. याबाबत राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.
“आर्थर रोड कारागृहात ज्या बॅरेकमध्ये होतो त्याच्या बाजूला एक विशेष बॅरेक बनवण्यात आली होती. ही बॅरेक खास बनवून घेतली होती आणि त्याची रोज साफसफाई करुन व्हिडीओ चित्रीकरण केले जात होते. लंडनवरून एक पाहुणा आलाच तर त्याच्यासाठी ही वेगळी व्यवस्था असे सांगण्यात आलं होतं. त्या पाहुण्याचे नाव म्हणजे निरव मोदी”, असं संजय राऊत लेखमध्ये म्हणाले.
“निरव मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात आहे. आपल्याला मुंबईत पाठवू नये, अशी मागणी त्याने कोर्टात केली. कारण भारतातील तुरुंग अमानवी स्वरूपाच्या आहेत. त्यामध्ये कमालीची अस्वच्छता आणि त्यांना जणू छळ छावण्याचे स्वरूप आहे. त्यामुळे मला लंडन तुरुंगातच ठेवा, अशी मागणी निरव मोदीने याचिकेत केलीय”, असं संजय राऊत म्हणाले.
“या याचिकेनंतर लंडन कोर्टाने आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून येथील तुरुंग व्यवस्थेचा अहवाल मागवला. त्यात मोदीसाठी निर्माण केलेल्या खास कोठडीचं चित्रण पाठवले. ही कोठडी प्रशस्त आहे. यामध्ये स्वतंत्र टीव्ही बाथरूम आहे, पण ही व्यवस्था इतर कैद्यांसाठी नाही”, असा दावा संजय राऊतांनी केला. “आर्थर रोडला बनवलेल्या कोठडीच्या बाजूच्या यार्डात मी आहे. निरव मोदी आला तर आपल्याला कंपनी मिळेल, असे मला वाटले होते, असंदेखील खासदार संजय राऊत लेखात म्हणाले.