मुंबई: मालाडमधील उद्यानाला देण्यात आलेलं टिपू सुलतान (Tipu Sultan) यांचं नाव आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते उद्घाटन यामुळे या वादावरून शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. उद्यानाला टिपू सुलतानचं नाव देण्यास विरोध केला आहे. भाजपच्या काही नेत्यांनी तर या प्रकरणी अस्लम शेख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर काही नेत्यांनी महाराष्ट्रात दंगल पेटेल असा इशाराही दिला आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर (bjp) हल्ला चढवला आहे. दंगल करून दाखवाच. इथे ठाकरे सरकार आहे, असा सज्जड दमच संजय राऊत यांनी भाजपला भरला आहे. संजय राऊत ( sanjay raut) यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपला जोरदार फटकारेही लगावले आहेत.
भाजप नेते राज पुरोहित यांनी अस्लम शेख यांचा राजीनामा मागतानाच राज्यात दंगली पेटतील असा इशारा दिला होता. त्यावर संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कोण करणार दंगली? हिंमत आहे का? जे दंगलीची भाषा करत आहेत त्यांनी करून दाखवावी. इथे ठाकरे सरकार आहे. दंगल करून दाखवाच, असा इशारा राऊत यांनी दिला.
आम्हाला इतिहास कळतो. तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाहीत. तुम्ही कशा पद्धतीने इतिहास बदलता, लिहिता, दिल्लीत स्वत:चा इतिहास कसा लिहायला घेतला हे आम्हाला माहीत आहे. टिपू सुलतान, हैदर अली, श्रीरंगपट्टणम, मैसूर राज्य सर्व आम्हाला माहीत आहे. टिपू सुलतानने काय अत्याचार, अन्याय केला, ब्रिटिशांसोबत कसा लढा दिला हे सर्व आम्हाला माहीत आहे. आम्हाला सांगायची गरज नाही. आंदोलन करू, महाराष्ट्र पेटवू ही भाषा तुमच्या तोंडी असेल तर या पेटवापेटवीतील महाराष्ट्रातील एक्सपर्ट कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे. पण आम्ही हे करत नाही, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी पद्म पुरस्कारावरून पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. मी फक्त त्यांना आठवण करून दिली. गेल्या काही वर्षात मरणोत्तरच पुरस्कार दिले जात आहे. आज माणूस जिवंत आहे, त्याला पुरस्कार देत नाही. मेल्यावर उद्या देतात. यावर काही तरी धोरण ठरवावं. वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, महात्मा फुले हे अपवाद आहेत. हा सन्मान आहे. पण पद्मश्री आणि पद्मभूषणही मरणोत्तर देत आहात. पद्मविभूषण मरणोत्तर देत आहात. निवडणुका आणि जात धर्म पाहून देता. कल्याणसिंह जिवंत असताना त्यांना पुरस्कार का दिला नाही? मी कल्याण सिंह यांच्याकडे भाजपचे नेते म्हणून पाहत नाही. कल्याण सिंह नसते तर त्या काळात शांतपणे बाबरीचं पतनही झालं नसतं. आम्ही तिथेच होतो. आमचे सैनिक तिथेच होते. कल्याणसिंह, शंकरदयाळ शर्मा नरसिंह राव हे सर्व सत्तेत होते. त्यामुळे कल्याण सिंह यांना पुरस्कार देण्यासाठी एवढा उशिर का झाला? असा सवाल त्यांनी केला.
संबंधित बातम्या: