उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत येण्याची ऑफर?; संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय?
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 'टीव्ही 9 मराठी'च्या 'लोकसभेचा महासंग्राम' या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्नांवर मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली.
मुंबई | 1 मार्च 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘लोकसभेचा महासंग्राम’ या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्नांवर मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली. या कार्यक्रमात संजय राऊत यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा भाजपसोबत येण्याची ऑफर आली तर जातील का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी सविस्तर आणि रोखठोक स्पष्टीकरण दिलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीत काय झालं हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितलं आहे. मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाली. मोदींचा कल वाटला की उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत यावं. ज्या पक्षांनी आपल्याला फसवलं, आपला पक्ष संपवण्यासाठी कारस्थान झालं, त्यांच्यासोबत का जायचं अशी आमच्या बैठकीत चर्चा झाली”, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
“भाजपचे अनेक प्रमुख नेते आता उद्धव ठाकरे यांच्यावर जाळं फेकण्याचं काम करत आहेत. आपण परत एकदा येऊ, बसू, आमच्या चुका झाल्या परत बसू. पण आम्ही त्यासंदर्भात रिअॅक्शन देत नाही. आम्ही महाविकास आघाडीत काम करतो. आम्ही शेवटपर्यंत आघाडीत राहू. आम्ही सातत्याने नितीश कुमार यांच्याप्रमाणे पलटी मारली तर आमच्यावर कोण विश्वास ठेवेल. आमच्या पक्षावरही. लोकांचा विश्वास महत्त्वाचा आहे. घेतलेला विचार अर्धवट सोडून जायचं नाही. भाजपसोबत २५ वर्ष गेलो. त्यांनी आमचा पक्ष फोडला. आमच्या लोकांना नादाला लावलं. वेगळ्या अर्थाने घ्या. नादाला लागलेलेल लोक फार काळ टिकत नाही. इतर ठिकाणी जात असतात. या तमाशातून त्या तमाशात जात असतात. आम्ही मात्र त्यांच्याकडे जायची गरज नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर?
“उद्धव ठाकरे आणि संजय राऊत वेगळे नाहीत हे सर्वांना माहीत आहे. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व हे लोकभावनेचा आदर करणारं आहे. राज्याची लोकभावना शिवसेनेच्या पाठीशी आहे. आघात झाले तरी हा माणूस लढतोय असं लोक म्हणतात. ज्यांनी आमच्यावर ही वेळ आणली त्यांच्यासोबत जाण्याएवढे आम्ही नालायक नाहीत. उद्धव ठाकरे यांना मी जास्त ओळखतो. लोकांचा आमच्यावरचा विश्वास उडेल. राजकारणावरचा विश्वास उडेल. आम्ही म्हणजे नितीश कुमार नाही”, असं राऊत म्हणाले.
“का जावं भाजपसोबत? असं काय आहे भाजपमध्ये? काय ठेवलंय? राजकारणात काहीही होऊ शकतं हे खरं आहे. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार बनवू असं वाटलं होतं का? ही वेळ भाजपने आणली. मग भाजपसोबत का जावं? शिवसेनेचं उत्तम चाललं आहे. चार माणसांशी लग्न करायला आम्ही काही एलिझाबेथ टेलर नाही. एलिझाबेथ टेलरने केली होती”, असा टोला राऊतांनी लगावला.
“महाराष्ट्रात अमित शाह आणि फडणवीस यांनी जो प्रयोग केला तो फसला. शिंदेंना शिवसेना दिली. त्यांच्याकडे अर्धा टकक्केही मतदान नाही. अजित पवारांकडे एक टक्काही मते नाही. हिंमत असेल तर ठाण्यात महापालिकेची निवडणूक घ्या. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाला घालण्याचं काम त्यांनी केलं. त्यांचं जुनं स्वप्न होतं. गुजरात्यांचं हे स्वप्न होतं. पण सत्ता कायम राहत नाही. आज आहे उद्या नाही. तेव्हा काय करणार?”, असा सवाल राऊतांनी केला.