संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून थेट पक्षप्रवेशाची ऑफर?
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आपल्याला पक्षप्रवेशाची ऑफर आलेली, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय. त्यांच्या या दाव्यावर आता शिवसेनेकडून काय भूमिका येते, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) निकालानंतर शिवसेना(Shiv Sena) पक्षाचे सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे गेले. त्यानंतर आता शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांची संसदीय नेतेपदावर गच्छंती करण्यात आलीय. तर खासदार गजानन कीर्तीकर यांची संसदीय नेतेपदी वर्णी करण्यात आलीय. शिवसेनेच्या या निर्णयाबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा गौप्यस्फोट केला. आपल्याला देखील शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्षात येण्याची ऑफर आलेली, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केलाय. पण आपण खोके घेतले नाहीत. निष्ठा सोडली नाही, असं राऊत म्हणाले.
“आम्ही खोके घेतले असते आणि गुडघे टेकले असते तर आम्ही त्या पदावर राहिलो असतो. आम्हालाही सांगण्यात आलं कशाला राहताय? काय राहिलंय? तुम्ही आमच्याकडे या. मी म्हटलं, मी थुकतो तुमच्या ऑफरवर. मी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आमची शिवसेना यांच्याशी बेईमानी करणार नाही. थुंकतोय तुमच्या ऑफरवर या भाषेत बोललो. असे अनेक पदं आम्ही ओवाळून टाकू. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही निष्ठावंत आहोत”, असं संजय राऊत म्हणाले.
“माझ्या पक्षाने मला जे दिलंय ते भरपूर दिलेलं आहे. निष्ठा राखण्यासाठी काही जात असेल तर आम्ही गमवायला तयार आहोत. पण एखाद्या पदासाठी लाचारी पत्कारणारा संजय राऊत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यावर जे संस्कार केले आहेत ना, ते निष्ठेचे आणि इमानदारीचे आहेत. पदासाठी, सत्तेसाठी गुडघे टेकण्यासाठी नाहीत. पद आज आहे, आज गेली उद्या परत येतील. तेवढी हिंमत आमच्या पक्षात आणि नेतृत्वात आहे”, असं संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं.
ठाकरे-फडणवीस भेटीवर संजय राऊत काय म्हणाले?
दरम्यान, विधान भवनात आज अनोखा प्रकार बघायला मिळाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या भेटीवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. “याचा अर्थ असा आहे की, उद्धव ठाकरेंनी वारंवार विधानसभेत जायला हवं. म्हणजे एकत्र भेटतील, बोलतील, चर्चा करतील. महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. विरोध राजकीय असतो, व्यक्तीगत नसतो. मी मागेही म्हणालो, कटुता संपवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. निवडणुकीत तुमचा पराभव करु. विचारांची लढाई विचारांनी करु. पण सुडाने, बदल्याच्या भावनेने कारवाई करणार असाल आणि तशी भाषा करणार असाल तर मग आम्हाला तशाच भाषेत उत्तर द्यावं लागेल. महाराष्ट्र हे एक संस्कारी राजकारण करणारं राज्य आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भेटून का बोलू नयेत? त्यांच्या भेटीमागे काही राजकीय संकेत आहेत, असं मला वाटत नाही. मी एवढा भोळा आशावादी नाही. ज्या पद्धतीचं राजकारण आमच्यासोबत गेल्या काही महिन्यात घडलं. ज्या जखमा आहेत त्या कधी भरुन काढता येणार नाहीत, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.