शिवसेना फुटीवरून संजय राऊत यांची अमित शाह यांना क्लिनचीट?; मग शिवसेना कुणी फोडली?
राम मंदिर बनवल्याने कोणी राम बनत नाही. अयोध्येत रामाचं मंदिर जनता बनवत आहे. भाजपची कृती रावणासारखी आहे. महाराष्ट्रात आणि देशात भाजप रावणासारखं वागत आहे, असा हल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चढवला आहे.
गणेश थोरात, टीव्ही9 मराठी, प्रतिनिधी मुंबई | 7 ऑक्टोबर 2023 : शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे गटाने या फुटीचं खापर थेट भाजपवर फोडलं होतं. त्यातही या फुटीमागे भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात होता. त्यावर भाजपकडूनही पलटवार करण्यात येत होते. मात्र, आता या विषयामध्ये नवा ट्विस्ट आला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना फोडण्याची अमित शाह यांची हिंमत नसल्याचं म्हटलं आहे. राऊत यांनी अमित शाह यांना क्लिनचीट दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राऊत यांच्या या विधानावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत हे मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदेंना सुद्धा ईडी आणि सीबीआयने फोडलंय. अमित शाह यांची शिवसेना फोडण्याची हिंमत नाहीये, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या स्वागताचे फलक शिंदे गटाने लावले आहे. त्यावरून टीका करताना राऊत यांनी हे विधान केलं आहे.
ही तर चायना मेड शिवसेना
नड्डा यांच्या स्वागताचे फलक मुख्यमंत्र्यांनी लावले. काय वेळ आलीय. अरे बाळासाहेब ठाकरे यांचे चेले म्हणवता आणि नड्डा यांच्या स्वागताचे मोठमोठे फलक लावता? ही वेळ आलीय तुमच्यावर? ही लुच्चेगिरी, ही लाचारी? तुम्ही शिवसेना म्हणताय ना स्वत:ला? असली शिवसेना आहात तर हे कुठून आलं? यांचं काय स्वागत? ही कोणती शिवसेना आहे? ही तर चायना मेड शिवसेना आहे. हा चायनाचा माल आहे हा, असा हल्लाच राऊत यांनी शिंदे गटावर चढवला.
सरकारचा नाड्डा दिल्लीत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरही राऊत यांनी खोचक टीका केली. सरकारच्या चड्डीचा नाडा दिल्लीत आहे. दिल्लीवाले या सरकारच्या चड्डीचा नाडा कधीही खेचतात. कधीही टाईट करतात. मुख्यमंत्री आणि दोन दोन उपमुख्यमंत्री पळत पळत दिल्लीत जातात. जेव्हा पाहावं तेव्हा मुख्यमंत्री कुठाय तर अमित शाहांना भेटायला गेले. मुख्यमंत्री कुठाय तर दिल्लीत गेले. मुख्यमंत्री कुठाय तर मुख्यमंत्री दिल्लीत महाराष्ट्र सदनात बसले. मग इथे कोण आहे? इथे कोण सरकार चालवणार? असा सवाल त्यांनी केला.
नक्षलवादी हल्ल्यात मारले नाही तेवढे…
मुख्यमंत्री उठसूट दिल्लीत जात आहेत. इथे सरकारी रुग्णालयात लोक मरत आहेत. 150 हून अधिक लोक आठ दिवसात दगावले आहेत. नागपूर, नांदेड, संभाजीनगर आणि इतर ठिकाणाहून बातम्या येत आहेत. सरकार कुठे आहे? मुख्यमंत्री दिल्लीत आहेत. नक्षलवादावर चर्चा करत आहेत. जेवढे लोक नक्षलवाद्याच्या हल्ल्यात महाराष्ट्रात दगावले नाहीत. तेवढे लोक आठ दिवसात सरकारी रुग्णालयात मेले आहेत. ही जबाबदारी सरकारची नाही का?, असा सवाल राऊत यांनी केला.