जीवे मारण्याच्या धमकीनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्या गँगने सलमान खानला…
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. ही धमकी आल्यानंतर राऊत यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं. सरकारला कळवून फायदा नाही. सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. लॉरेन्स बिश्नोई या पंजाबमधील खतरनाक गँगस्टरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी आल्यानंतर राऊत यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं आहे. धमकी देणारा हा पुण्यातील व्यक्ती असल्याचं सांगितलं जात आहे. काल रात्री ही धमकी देण्यात आली होती. ही बातमी फुटल्यानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
ही पहिल्यांदाच धमकी आली नाही. हे सरकार आल्यानंतर आमची सुरक्षा हटवली. त्याबद्दल मी कुणाला पत्र लिहिलं नाही. पण वारंवार मुख्यमंत्र्यांचा मुलगा एक षडयंत्र रचतो. एका गुंडाला हाताशी धरून माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचतो. त्याची माहिती दिल्यानंतर मी स्टंट करतो असं राज्याचे गृहमंत्री म्हणतात, अशी टीका करतानाच ज्या गँगने सलमानला धमकी दिली. त्याच गँगने मला धमकी दिली. पोलिसांनी काही लोकांना पकडलं आहे. धमकी आल्यानंतर मी पोलिसांना कळवलं आहे. उद्या मी कळवलं नाही असं होऊ नाही म्हणून मी पोलिसांना कळवलं, असं संजय राऊत म्हणाले.
आहे त्या परिस्थितीला सामोरे जाऊ
या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना विरोधकांकडे पाहण्यासाठी वेळ नाही. आम्ही धमक्याची माहिती देतो तेव्हा गृहमंत्री चेष्टा करतात. हा स्टंट आहे म्हणतात. ठाण्यातील एका गुंडाने धमकी दिली. त्यात मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकचं नाव आहे. ते गांभीर्याने घेतलं नाही. मी माहिती दिली. काल आलेल्या धमकीचा मला राजकीय इश्यू करायचा नाही. विरोधकांना आलेल्या कोणत्याही धमक्या हे सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही. पोलीस यंत्रणा फक्त विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी, खोट्या कारवाईसाठी वापरत आहे. असंच चालू राहू द्या. आम्ही आहे त्या परिस्थितीला सामोरे जाऊ, असं ते म्हणाले.
सरकार गेंड्याच्या कातडीचं
मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना रात्रीच कळवलं आहे. खासदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून पोलिसांना कळवावं असं वाटलं. सरकारला कळवून फायदा नाही. सरकार निर्ढावलेलं आहे. गेंड्याच्या कातडीचं आहे. विरोधकांना मारण्यापर्यंत त्यांची मजल जाऊ शकते, असा आरोपही त्यांनी केला.